माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार
गोवा, 13 ऑक्टोबर 2023
54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(इफ्फी) प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये ही घोषणा केली आहे. जागतिक चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाच्या वार्षिक कार्यक्रमांपैकी एक असलेल्या 54व्या इफ्फीमध्ये मायकेल डग्लस यांची पत्नी म्हणजे नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हे देखील उपस्थित राहणार आहेत. भारतीय चित्रपट उद्योगात 25 वर्षे पूर्ण करणारे भारतीय चित्रपट निर्माते आणि पर्सेप्ट लिमिटेड आणि सनबर्न म्युझिक फेस्टीव्हलचे संस्थापक शैलेंद्र सिंग हे देखील या महोत्सवाला उपस्थित असतील.
एक्सवर ही घोषणा करत असताना अनुराग सिंह ठाकूर यांनी मायकेल डग्लस, त्यांची पत्नी कॅथरिन झिटा जोन्स आणि त्यांचा पुत्र डायलन डग्लस यांचे स्वागत केले आहे. भारतामध्ये मायकेल डग्लस यांची लोकप्रियता सर्वश्रृत आहे आणि आमचा देश आपली समृद्ध सिनेमॅटिक संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांचे दर्शन घडवण्यासाठी उत्सुक आहे, असे त्यांनी सांगितले.
सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराची सुरुवात 1999 मध्ये 30 व्या इफ्फी मधे झाली. चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. चित्रपट जगतातील दिग्गज म्हणून मायकेल डग्लस यांची ओळख आहे. आपल्या अतुलनीय प्रतिभेने आणि कलेशी असलेल्या बांधिलकीने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे.
मायकेल डग्लस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार यांचा यात समावेश आहे. “वॉल स्ट्रीट (1987)”, “बेसिक इन्स्टिंक्ट (1992)”, “फॉलिंग डाउन (1993)”, “द अमेरिकन प्रेसिडेंट (1995)”, “ट्रॅफिक (2000)” आणि “बिहाइंड द कँडलब्रा (2013)” यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी सिनेरसिक आणि चित्रपट जगतात आपला अमीट ठसा उमटवला आहे. समीक्षकांनी गौरवलेल्या "वन फ्लू ओव्हर द कुक्कूज नेस्ट (1975)", "द चायना सिंड्रोम (1979)", आणि "द गेम (1999)" यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
1998 मध्ये, अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि लहान आणि हलक्या शस्त्रांचा अवैध व्यापार थांबवणे, यासह निःशस्त्रीकरणाच्या मुद्द्यांवरील वचनबद्धतेसाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांचा (UN) शांतता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कान चित्रपट महोत्सवात मानद पाम डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, जो जागतिक चित्रपट क्षेत्रावरील त्यांच्या दीर्घकालीन प्रभावाचा दाखला आहे.
कॅथरीन झेटा जोन्स, ही बहुपैलू समर्थ अभिनेत्री, चित्रपट सृष्टीसाठी तिने दिलेले योगदान आणि परोपकारासाठीच्या वचनबद्धतेसाठी ओळखली जाते. तिच्या उल्लेखनीय कारकिर्दीत "ट्रॅफिक (200)", "शिकागो (2002)", आणि "द मास्क ऑफ झोरो (1998) यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अविस्मरणीय कामगिरीचा समावेश आहे, ज्याने तिला समीक्षक आणि असंख्य चाहत्यांची प्रशंसा मिळवून दिली. त्यांना अकादमी (ऑस्कर) पुरस्कार आणि ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) पुरस्कार देखील मिळाला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मायकेल डग्लस यांना कान चित्रपट महोत्सवादरम्यान एका भव्य कार्यक्रमात, इंडिया पॅव्हेलियनमध्ये मार्चे डू फिल्म अंतर्गत सन्मानित करण्यात आले होते, ज्यामधून चित्रपट उद्योगावरील त्यांचा जागतिक प्रभाव अधोरेखित होतो.
इन कॉन्वेर्सेशन
54 व्या इफ्फीचा भाग म्हणून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंह यांच्या विशेष इन कॉन्वेर्सेशन सत्रातही मायकेल डग्लस आणि कॅथरीन झेटा जोन्स सहभागी होणार आहेत. शैलेंद्र सिंह,भारतीय चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध असून पर्सेप्ट लिमिटेड या कंपनीचे आणि सनबर्न संगीत महोत्सवाचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या 'फिर मिलेंगे'(2004) आणि 'कांचीवरम' (2008) यासारख्या त्यांच्या चित्रपटांना समीक्षकांची पसंती लाभली असून त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली. त्यांच्या 'कांचिवरम' चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला होता.
यापूर्वी बर्नार्डो बर्टोलुची (इफ्फी 30), कार्लोस सौरा (इफ्फी 53),मार्टिन स्कॉर्सेसी (इफ्फी 52), दिलीप कुमार (इफ्फी 38), क्रिझिस्टोफ झानुसी (इफ्फी 43) आणि वोंग कार- वाय (इफ्फी 45) यांसारख्या दिग्गजांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
54 व्या इफ्फी महोत्सवात मायकेल डग्लस, कॅथरीन झेटा जोन्स आणि शैलेंद्र सिंह यांच्या विलक्षण कामगिरीच्या सन्मान करण्यात येणार असून हा महोत्सव सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा एक भव्य सोहळा असेल, हे निश्चित!
* * *
PIB Panaji | R.Aghor/Shailesh/Vinayak/Rajshree/Sonali K/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967364)
Visitor Counter : 213