नौवहन मंत्रालय

देशाच्या सागरी क्षेत्रासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने आणल्या प्रचंड प्रमाणात संधी


येत्या 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी शिखर परिषद 2023 चे आयोजन

Posted On: 09 OCT 2023 6:06PM by PIB Mumbai

मुंबई, 9 ऑक्टोबर 2023

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद  सोनोवाल यांनी आज मुंबईत या जीएमआयएस 2023 संदर्भात प्रसार माध्यम प्रतिनिधींना माहिती देऊन त्यांना या परिषदेला उपस्थित राहण्याचे दिले आमंत्रण केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय  देशातील सागरी क्षेत्राशी संबंधित आणि बहुप्रतीक्षित अशा तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी शिखर परिषद 2023 (जीएमआयएस-2023) च्या आयोजनाची तयारी करत आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (पीएसडब्ल्यू) आणि आयुष मंत्री सर्बानंद  सोनोवाल यांनी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (पीएसडब्ल्यू) राज्यमंत्री श्रीपाद वाय.नाईक यांच्यासह आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यम प्रतिनिधींना या संदर्भात अधिक माहिती दिली. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर येत्या 17 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत या जीएमआयएस-2023 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

उपस्थित प्रसार माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय पीएसडब्ल्यू मंत्री सर्बानंद  सोनोवाल म्हणाले, पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेला अनुसरून, जागतिक सागरी समस्यांवर भर देणाऱ्या चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने जीएमआयएस-2023मधील प्रत्येक सत्राची रचना करण्यात आली आहे.

जीएमआयएस-2023 ही परिषद पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनुसार आयोजित केली असून त्यात सरकारी-खासगी भागीदारीसाठी उपलब्ध असलेल्या विस्तृत प्रमाणातील संधींचा उहापोह करण्यात येणार असून, 15 लाख रोजगार संधींच्या निर्मितीक्षमतेसह या क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत, केंद्रीय मंत्री सोनोवाल पुढे  म्हणाले.

ते म्हणाले, सागरी क्षेत्रातील उद्योगांची भरभराट होण्यासाठी हरित बंदरे, शाश्वत पायाभूत सुविधा, क्रुझ पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करून नील अर्थव्यवस्थेची जोपासना करणे हा आमचा दृष्टीकोन  आहे.

या प्रसंगी जीएमआयएस 2023 ची माहिती देणाऱ्या नेव्हीगेटिंग एक्सलन्स : इंडियाज मेरिटाईम सेक्टर या शीर्षकाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

आवाका आणि सहभाग या घटकांचा विचार करता, तिसरी  जागतिक भारतीय सागरी शिखर परिषद 2023 यापूर्वीच्या म्हणजे 2016 आणि 2021 या वर्षी आयोजित परिषदांच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणात तसेच अधिक समावेशक पद्धतीने आयोजित केलेली असेल हे लक्षात घेतले पाहिजे.

जीएमआयएस 2023 मध्ये जगातील 70 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका,आर्मेनिया, इटली, श्रीलंका, तुर्कमेनिस्तान, बेलारुस, बांगलादेश आणि मादागास्कर या देशांच्या जेष्ठ मंत्र्यांची पथके या परिषदेत सहभागी होतील. सुमारे 250 पेक्षा जास्त संख्येने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेला उपस्थित राहतील. या तीन दिवसीय परिषदेत 20 पेक्षा जास्त संकल्पनाधारित सत्रे तसेच 7 आंतरराष्ट्रीय गोलमेज बैठका आणि 13 हून अधिक क्षेत्रीय आणि देशांदरम्यानची चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यात मुख्यत्वे, बिमस्टेक देशांमधील क्षेत्रीय सहकार्य,चाबहार आणि आयएनएसटीसी (आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका), आफ्रिका, हिंद-प्रशांत, युरोप आणि नव्याने स्थापन झालेली आयएमईसी (भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिका) यांच्यावर आधारित चर्चासत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय सचिव टी.के रामचंद्रन यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, जीएमआयएस या परिषदेच्या आयोजनातून, बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि सागरी क्षेत्रातील शिक्षण यांसारख्या वैविध्यपूर्ण सागरी क्षेत्रांमध्ये सरकारी-खासगी भागीदारीसाठी विस्तृत मंच उपलब्ध होतो. या परिषदेने ,भविष्यकालीन बंदरे, निःकार्बनीकरण, तटवर्ती नौवहन आणि अंतर्गत जल वाहतूक (आयडब्ल्यूटी), जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर, वित्तपुरवठा, विमा आणि लवाद, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि सुरक्षितता तसेच सागरी पर्यटन यांसह लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे अशी  अनेक क्षेत्रे  निश्चित केली आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा देखील यावेळी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://maritimeindiasummit.com/ 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966051) Visitor Counter : 120


Read this release in: Urdu , English , Hindi , Gujarati