शिक्षण मंत्रालय
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स च्या 29 व्या दीक्षांत समारंभात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मार्गदर्शन; सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील, सिंबॉयसिस ईशान्य भवनाचेही केले उद्घाटन
भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्यातील क्षमता वाढवण्याचे प्रधान यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
व्यापक विचार करा आणि समाजाच्या आशा-आकांक्षा तसेच जागतिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची दृष्टी घेऊन पुढे वाटचाल करा – धर्मेंद्र प्रधान
Posted On:
07 OCT 2023 4:36PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई) संस्थेच्या 29 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इतर मान्यवर आणि शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीक्षांत समारंभात बोलतांना प्रधान यांनी आज पदवी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना आपल्या क्षमता आणि जीवनकौशल्ये वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. जीआयपीई ही संस्था अनेक अभिनव कल्पनांचे आगर आहे, तसेच प्रयोगशील शिक्षणाचेही केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भारतातील या गुणवान युवा शक्तीच्या जोरावर, येत्या 25 वर्षात, देशात अनेक महत्वाच्या घडामोडी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. म्हणूनच युवकांनी विचारांचा व्यापक पल्ला ठेवत समाजाच्या आकांक्षा तसेच जागतिक जबाबदाऱ्या पार पडण्याच्या दृष्टीने स्वतःची तयारी करत पुढे वाटचाल करावी.
एकविसावे शतक, ज्ञान-आधारित समाजाचे शतक राहणार असून त्यात विकास, वृद्धी, अर्थकारण आणि एकूणच समाजाच्या उभारणीसाठी ज्ञान हाच प्राथमिक आधार असेल. आज भारतीयांवर नव्या जागतिक जबाबदाऱ्या आहेत तसेच त्यांची दृष्टी आणि कृती संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारी हवी यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यापासून, ते स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महत्वाची धोरणे आखतांना, यात अगदी कृषी, शिक्षण, कृषिमालाची किंमत, कुटुंब नियोजन बँकिंग आणि सहकारी चळवळ अशा अनेक विषयांवर संशोधन करून या संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे, असेही प्रधान यांनी नमूद केले.
या कार्यक्रमानंतर, धर्मेंद्र प्रधान, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संमेलन समारंभात देखील सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलतांना, प्रधान यांनी पुण्याची महती सांगितली. भारतीय समाजरचनेला दिशा देण्यात पुण्याने आघाडीची भूमिका घेतली होती, आणि यामधल्या केंद्रस्थानापैकी सावित्रीबाई फुले विद्यापीठ एक होते, असा उल्लेख त्यांनी केला. आज नव्याने उदयाला येत असलेल्या अर्थव्यवस्थाना भारत-प्रणित मॉडेल कडून अनेक अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्तता करण्याची पुण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण संशोधन, धोरणात्मक निर्णय, शिक्षण, लोककल्याण-केंद्री प्रशासन आणि महिला-प्रणित विकास, वैज्ञानिक संशोधन अशा महत्त्वाच्या क्षेत्रात, पुण्याने दिलेल्या योगदानाबद्दल प्रधान यांनी आपल्या भाषणातून भर दिला.
जागतिक पर्यावरणीय आरोग्यासाठी कार्यरत आणि पुण्यात काही काळ काम केलेले प्रसिद्ध प्राध्यापक किर्क स्मिथ यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचाही त्यांनी उल्लेख केला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एलपीजी अनुदान देण्याच्या त्यांच्या सूचनांमुळे उज्ज्वला योजनेची सुरुवात झाली, असे प्रधान यांनी नमूद केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सिंबायोसिस ईशान्य भवनाचे उद्घाटन केले.
आजच्या कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. एस.बी. मुजुमदार; प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती; कथ्थक नृत्यांगना शमा भाटे; आणि प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांचाही समावेश होता.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965463)
Visitor Counter : 182