वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुंतवणुकीसंदर्भातील भारत-संयुक्त अरब अमिराती उच्चस्तरीय संयुक्त कृतीदलाची 11 वी बैठक

Posted On: 05 OCT 2023 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

गुंतवणुकीवरील भारत-संयुक्त अरब अमिराती  उच्चस्तरीय संयुक्त कृतीदलाची अकरावी बैठक आज अबुधाबी येथे आयोजित करण्यात आली होती. अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमद बिन झायेद अल नाहयान आणि भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  पियूष  गोयल यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांना चालना  देण्यासाठी 2013 मध्ये संयुक्त कृतीदलाची स्थापना करण्यात आली होती.

आजच्या  बैठकी दरम्यान, सह-अध्यक्षांनी मे 2022 मध्ये लागू करण्यात आलेल्या  संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या  (सीईपीए )  अंमलबजावणीसंदर्भात  झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

संयुक्त कार्य दलाच्या शिष्टमंडळांनी भारत-संयुक्त अरब अमिराती द्विपक्षीय गुंतवणूक करारासाठी वाटाघाटींच्या सद्यस्थितीवर चर्चा केली आणि दोन्ही देशांना आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणाऱ्या संतुलित कराराच्या लवकर निर्णयासाठी द्विपक्षीय चर्चेला गती देण्याची गरज अधोरेखित केली.

संयुक्त अरब अमिरातीमधील  सार्वभौम गुंतवणूक संस्थांकडून भारतात गुंतवणुकीचा ओघ  आणखी वाढवण्यास  प्रोत्साहन देण्यासाठीचे मार्ग आणि प्रोत्साहनांवरही उभय देशांनी चर्चा केली. या संदर्भात, भारताच्या बाजूने  यावेळी  भारतातील नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, सेमी-कंडक्टर आणि मालमत्ता मुद्रीकरण क्षेत्र यासारख्या प्राधान्य क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी सामायिक करण्यात आल्या.

या संदर्भात, संयुक्त अरब अमिरातीमध्ये  मध्ये भारतीय गुंतवणूक सुलभ  करण्यासाठी जलदगती  यंत्रणा तयार करण्याच्या प्रगतीवरही चर्चा झाली.

संयुक्त अरब अमिरातीच्या  अर्थ मंत्रालय आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या भारत-संयुक्त अरब अमिराती स्टार्ट-अप ब्रिज  यावरही  चर्चा झाली

उभय देशांमधील कागदरहित व्यापार सुलभ करण्यासाठी, कार्यक्षमता आणि सुरक्षा यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने  डेटा विनिमय यंत्रणा  विकसित करून एकंदर व्यापाराचे प्रमाण वाढवण्याच्या उद्दिष्टाने  अबुधाबी –भारत आभासी व्यापार  कॉरिडॉरची स्थापना हा या बैठकीतील महत्वाचा विषय होता.

सह-अध्यक्षांनी भारतातील I2U2 रुपरेषे अंतर्गत अन्न सुरक्षा कॉरिडॉर संबंधित गुंतवणुकीसह महत्त्वाच्या प्रकल्पांवरील प्रगतीचाही आढावा घेतला.

उद्योग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याशी संबंधित सामंजस्य करारावर संयुक्त कृती दलाच्या उपस्थितीत  संयुक्त अरब अमिरातीच्या उद्योग आणि अत्याधुनिक  तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारताच्या  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे अंतराळ , आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यवर्ती बँकेची उपकंपनी अल इतिहाद पेमेंट्स आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यातही एक करार झाला.

भारत सरकारचे  वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  आणि संयुक्त कृती दलाचे सह-अध्यक्ष पियूष गोयल यांनी सांगितले की, या संयुक्त कृती दलाच्या दुसर्‍या फलदायी बैठकीच्या समारोपाने अनेक विषयांवर चर्चा होऊन  गोष्टी मार्गी लागल्या . विद्यमान सहकार्यांचा आढावा घेण्यात आला  आणि बळकटीकरण करण्यात आले तसेच भागीदारीसाठी नवीन संधी शोधण्यात आल्या.

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964842) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu