वस्त्रोद्योग मंत्रालय
यंत्रमाग उद्योगाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये 46.74 कोटी रूपये मूल्याच्या 18 संशोधन आणि विकास प्रकल्पांना वस्त्रोद्योग मंत्रालयाची मंजुरी
Posted On:
28 SEP 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
भारतातील यंत्रमाग वस्त्रोद्योगाच्या देशांतर्गत विकासासाठी उद्योग आणि संस्थांची सक्रीय आणि मजबूत भागीदारी आवश्यक असल्याचे, केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे, राष्ट्रीय यंत्रमाग वस्त्रोद्योग मिशन अंतर्गत मोहिम सुकाणु गटाच्या (एमएसजी) सातव्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते.
वस्त्रोद्योग मंत्रालयाने या बैठकीत जिओटेक, प्रोटेक, इंड्युटेक, सस्टेनेबल टेक्सटाइल्स, स्पोर्टटेक, स्मार्ट ई-टेक्सटाइल्स, मेडीटेक सेगमेंट या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांमधल्या 46.74 कोटी रूपये मूल्याच्या 18 संशोधन आणि विकास प्रकल्पांना मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय यंत्रमाग वस्त्रोद्योग मिशनच्या विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये मंजूर संशोधन आणि विकास उत्पादनांचा आढावा, मिशन मोडमधील संशोधन आणि विकास प्रकल्प, ग्रेट (GREAT) मार्गदर्शक तत्त्वांतर्गत यंत्रमाग वस्त्रोद्योगातील स्टार्टअपसाठी समितीची स्थापना, पोहोच उपक्रम तसेच जुलै आणि सप्टेंबर 2023 मध्ये आयोजित, MOT-FICCI-BIS मानके आणि नियमन यावरील राष्ट्रीय परिषद आणि सहाव्या मेडीटेक्स परिषदेचा समावेश होता.
ते पुढे म्हणाले की भारतात आयात केली जाणारी यंत्रमाग वस्त्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण धागे तसेच जगात मोठ्या प्रमाणात आयात केल्या जाणाऱ्या यांत्रिक वस्त्रांसाठी संशोधन आणि विकासावर भर दिला पाहिजे. याशिवाय, शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास आघाडीवरील प्रगतीचाही केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला, ज्यामध्ये 15 सार्वजनिक आणि 11 खासगी संस्थांच्या एकूण 151.02 कोटी रूपये मूल्याच्या 26 प्रस्तावांना, कागदपत्रे सादर करणे, प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांची खरेदी करणे आणि यंत्रमाग कापड उद्योगाच्या विविध विभागांमधील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यासाठी मंजूरी देण्यात आली.
* * *
M.Pange/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961855)
Visitor Counter : 114