निती आयोग
azadi ka amrit mahotsav

जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2023 मध्ये भारत 40 व्या स्थानावर


नीती आयोग भारतामधील जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2023 च्या प्रकाशनाचे आयोजन करणार

Posted On: 28 SEP 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (जीआयआय) 2023, अर्थात जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारी 2023 मध्ये जगातील 132 अर्थव्यवस्थांमध्ये भारताने 40 वे स्थान प्राप्त केले आहे. जीआयआय क्रमवारीमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचे स्थान सातत्त्याने उंचावत असून, 2015 मधील 81 व्या स्थानावरून, 2023 मध्ये भारत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. साथरोगामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाविरोधातल्या आपल्या लढाईत नवोन्मेष आघाडीवर असून पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनात नमूद केल्यानुसार देशाच्या लवचिकतेला चालना देण्यामध्ये हा नवोन्मेष निर्णायक भूमिका बजावेल.    

ज्ञानाचे विपुल भांडवल, गतिमान स्टार्ट-अप परिसंस्था तसेच सार्वजनिक आणि खासगी संशोधन संस्थांनी केलेले लक्षवेधी काम यामुळे भारताच्या जीआयआय क्रमवारीत सातत्याने सुधारणा होत आहे.

सरकारच्या सर्व विभागांनी राष्ट्रीय नवोन्मेष परिसंस्थेला समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग, आणि अणुऊर्जा विभाग यासारखे वैज्ञानिक विभाग, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दूरसंचार विभाग, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, आणि आरोग्य संशोधन विभाग यासारख्या विभागांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अटल इनोव्हेशन मिशनने नवोन्मेष परिसंस्थेचा विस्तार करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

नीती आयोग इलेक्ट्रिक वाहने, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, अंतराळ, पर्यायी ऊर्जा स्रोत अशा विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक नवोन्मेष आणण्याच्या दृष्टीने, देश-पातळीवर सवोत्तम प्रयत्न करण्याचा अथक प्रयत्न करत आहे. राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये नवोन्मेष परिसंस्थेचा विस्तार करण्याच्या कामी या प्रयत्नांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. नीती आयोगाने जीआयआय सह इतर जागतिक क्रमवारीत भारताच्या स्थानाचे परीक्षण आणि मूल्यमापन करण्यावर सतत भर दिला आहे.

जीआयआय हे जगभरातील सरकारांसाठी संबंधित देशांमधील नवोन्मेषा’अंतर्गत झालेल्या सामाजिक आणि आर्थिक बदलांचे मूल्यांकन करण्याचे एक विश्वसनीय साधन आहे. गेल्या काही वर्षांत, जीआयआय ने स्वतःला विविध सरकारांसाठी धोरण बनवण्याचे एक साधन म्हणून स्थापित केले आहे आणि त्यांना सद्यःस्थितीवर विचार करण्यास सहाय्य केले आहे.

भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) देखील भारताच्या नवोन्मेष-आधारित अर्थव्यवस्थेच्या प्रवासात सहकार्य करत आहे. या वर्षी, नीती आयोग, सीआयआय आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) सहयोगाने, 29 सप्टेंबर 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जीआयआय  2023 चे भारतामध्ये प्रकाशन करणार आहे.

प्रकाशन समारंभाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी; नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत; नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम; विपो (WIPO) चे महासंचालक डॅरेन तांग; जीआयआय सह-संपादक तसेच अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग प्रमुख डॉ. साचा वुन्श-व्हिन्सेंट; अध्यक्ष, सीआयआय नॅशनल कमिटी ऑन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड रिसर्च आणि सह-अध्यक्ष, फोर्ब्स मार्शल  डॉ. नौसाद फोर्ब्स; बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. ऋषिकेश कृष्णन; आणि सीआयआय नॅशनल कमिटी ऑन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड रिसर्चचे सह-अध्यक्ष, आणि जीई इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरचे सीईओ आलोक नंदा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

 

* * *

M.Pange/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961710) Visitor Counter : 403