रसायन आणि खते मंत्रालय
डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज भारतातील फार्मा - मेड टेक क्षेत्रात संशोधन, विकास आणि नवोन्मेषावरील राष्ट्रीय धोरण आणि फार्मा-मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषासाठी प्रोत्साहन योजनेचा प्रारंभ
Posted On:
26 SEP 2023 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
"आजचा दिवस खरोखर ऐतिहासिक असून औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील हे एक निर्णायक वळण आहे. आपल्याला भारतीय औषधनिर्माण आणि मेड टेक क्षेत्राचे रूपांतर किंमत आधारित उद्योगातून मूल्य-आधारित आणि नवकल्पना-आधारित उद्योगात करणे आवश्यक आहे." असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री,डॉ मनसुख मांडवीय यांनी आज भारतातील फार्मा मेड टेक क्षेत्रात संशोधन, विकास आणि नवोन्मेषावरील राष्ट्रीय धोरण आणि फार्मा-मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाच्या प्रोत्साहन योजनेचा प्रारंभ करताना सांगितले.
ही योजना भारताला औषधनिर्माण क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेत गुणवत्ता, सहज उपलब्धता आणि परवडण्याजोगी किंमत या निकषांवर उच्च-पातळीवरील, उच्च-मूल्याचा भागीदार बनवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे या योजनेच्या लाभांविषयी माहिती देताना डॉ मांडवीय यांनी सांगितले. या योजनेमुळे कौशल्य आणि क्षमता यांची सांगड घातलेली परिसंस्था विकसित होऊ शकेल ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांसह खाजगी क्षेत्राचा देखील सहभाग असेल आणि स्टार्ट अप्स च्या माध्यमातून युवकांमधील नवप्रतिभेला चालना मिळेल, असेही ते पुढे म्हणाले.
या योजनेच्या महत्वावर अधिक भर देताना डॉ मनसुख मांडवीय म्हणाले की भारत औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात संशोधन आणि विकास विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करूनच आत्मनिर्भरता साध्य करू शकतो ज्यामुळे सर्वांना सहजसुलभरीत्या जीवरक्षक औषधे मिळू शकतील आणि भारत एक औषधनिर्माण आणि वैद्यकीय निर्यातीचे जागतिक केंद्र म्हणून उदयाला येईल.”
भूतकाळातून धडा घेत भारत जगाचे नेतृत्व करत आहे, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यावेळी म्हणाले. सुधारणांच्या या अनेक पैलूंमुळे फार्मा मेड टेक क्षेत्राचा कायापालट होईल, ही योजना आणि या उपक्रमांमुळे आपण भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ आणि राष्ट्रीय जैव सुरक्षितता साध्य करू,असे त्यांनी सांगितले.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960914)
Visitor Counter : 150