संरक्षण मंत्रालय
हिंद-प्रशांत प्रदेशाच्या समृध्द, सुरक्षित आणि समावेशक भविष्यासाठी या प्रदेशातील गुंतागुंतीचे विषय आणि अफाट क्षमता यांना एकत्रित प्रयत्नांची जोड देणे गरजेचे आहे -नवी दिल्ली येथे भरलेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या 13 व्या परिषदेत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
26 SEP 2023 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
हिंद-प्रशांत प्रदेशाच्या समृध्द, सुरक्षित आणि समावेशक भविष्याच्या सुनिश्चीतीसाठी या प्रदेशातील संपूर्ण क्षमतेचा वापर करतानाच तेथील गुंतागुंतीचे मुद्दे सोडवण्यात सामुहिक सामंजस्य आणि एकत्रित प्रयत्नांची कास धरण्याचे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. प्राचीन भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’या तत्वाला तसेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या जी-20 समूहाच्या ध्येयवाक्याला अनुसरून हे प्रयत्न व्हायला हवेत असे ते म्हणाले. नवी दिल्ली येथे, आज,26 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित, हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या 13 व्या परिषदेत (आयपीएसीसी) उद्घाटनपर भाषण करताना संरक्षणमंत्री बोलत होते. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि एकूण 35 देशांचे सेनादल प्रमुख तसेच प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
यावेळी बोलताना, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की हिंद-प्रशांत क्षेत्र ही केवळ सागरी रचना राहिली नसून आता ती परिपूर्ण स्वरुपाची भू-सामरिक रचना झाली आहे. ते म्हणाले की या क्षेत्राला सीमाविषयक विवाद आणि चाचेगिरीसह अनेक संरक्षणविषयक आव्हानांच्या क्लिष्ट जाळ्याला तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकी लेखक आणि वक्ते स्टीफन आर.कॉव्हे यांच्या 'सर्कल ऑफ़ कंसर्न' आणि 'सर्कल ऑफ़ इन्फ्लुएंस‘ या दोन चक्रांवर आधारलेल्या सैद्धांतिक नमुन्याच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांनी त्यांची संकल्पना स्पष्ट केली.
'सर्कल ऑफ़ कंसर्न' नियंत्रणात असलेल्या तसेच नसलेल्या अनेक गोष्टींसह प्रत्येक बाबीला आपल्यात समाविष्ट करून घेते. यामध्ये बाह्य घटकांची मोठी श्रेणी तसेच जागतिक घडामोडी, आर्थिक परिस्थिती, इतरांची मते, हवामान आणि जीवनाच्या इतर अनेक पैलूंसारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष नियंत्रणात असलेल्या तसेच काही प्रमाणात प्रभाव टाकता येऊ शकेल अशा गोष्टींचा समावेश 'सर्कल ऑफ़ इन्फ्लुएंस‘ मध्ये होतो. त्यात तुमची वृत्ती, वर्तणूक, निर्णय, नातेसंबंध आणि कृती यांचा सहभाग असतो.
जागतिक समस्यांमध्ये विविध भागधारकांचा समावेश असतो आणि कोणताही एक देश स्वतंत्रपणे या आव्हानांचा सामना करू शकत नाही याची जाणीव सर्व देशांनी ठेवली पाहिजे याकडे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी निर्देश केला. 'सर्कल ऑफ़ कंसर्न' ’च्या कक्षेतील सामायिक समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला अधिक विस्तृत प्रमाणात सहभागी करून घेण्याच्या तसेच राजनैतिक मुत्सद्देगिरी, आंतरराष्ट्रीय संघटना आणि करार यांच्या माध्यमातून सहकार्याने कृती करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
मात्र, त्याच वेळी, देशांनी जागतिक मंचावर आपापल्या राष्ट्रीय हिताला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची ‘'सर्कल ऑफ़ इन्फ्लुएंस‘’ निश्चित करून त्यांचा विस्तार केला पाहिजे असे मत देखील रंरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले.
सामायिक सुरक्षितता आणि समृद्धी यांचा पाठपुरावा करतानाच, स्वतंत्र, खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारताने घेतलेल्या भूमिकेचा केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. अनादि काळापासून ‘शेजारधर्माला प्राधान्य’ ही भारताच्या संस्कृतीमधील महत्त्वाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.हिंद-प्रशांत प्रदेशाप्रती भारताचा दृष्टीकोन ‘अॅक्ट इस्ट पॉलिसी’ म्हणजेच पूर्वेकडील देशांना सक्रीय मदत करण्याचा राहिला आहे असे ते म्हणाले.
25 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत 35 देशांचे सेनादल प्रमुख तसेच प्रतिनिधी यांचा सहभाग असलेली तीन दिवसीय परिषद, 13 वी आयपीएसीसी, 47 वी आयपीएएमएस आणि 9 वी एसईएलएफ चे यजमानपद भारतीय लष्कर तसेच अमेरिकेचे लष्कर संयुक्तपणे भूषवत आहेत.
‘शांततेसाठी एकत्र येणे: हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम राखणे’ ही या मंचाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही परिषद संबंधित देशांचे लष्कर प्रमुख आणि लाक्षरांतील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना संरक्षण आणि इतर समकालीन समस्यांच्या संदर्भात कल्पना तसेच मतांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळवून देईल.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960862)
Visitor Counter : 139