संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांची अमेरिकेला भेट
Posted On:
24 SEP 2023 12:56PM by PIB Mumbai
नौदल प्रमुख (CNS) ॲडमिरल आर हरी कुमार यांनी 19 ते 22 सप्टेंबर 2023 दरम्यान अमेरिकेत २५ व्या आंतरराष्ट्रीय सागर शक्ति परिषदेत (ISS) सहभाग घेतला.
अमेरिकेच्या नौदलाकडून न्यूपोर्टच्या ऱ्होड आयलँड इथे नौदल युद्ध महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सागर शक्ती परिषदेचे आयोजन केले जात असून परदेशी आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून इंडो-पॅसिफिक सागरी सहकार्य वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने सामायिक दृष्टिकोन व्यापक करण्याची संधी याद्वारे मिळते.
आंतरराष्ट्रीय सागर परिषदेच्या पार्श्वभूमीवर नौदल प्रमुखांनी विविध देशांच्या आपल्या समकक्ष नौदल प्रमुखांशी द्विपक्षीय संवाद साधला. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, फिजी, इस्राएल, इटली, जपान, केनिया, पेरू, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि इंग्लंड या देशांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान मुक्त खुल्या आणि समावेशक इंडो-पॅसिफिक आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित आज्ञावली निभावण्याबाबत भारतीय नौदलाची खंबीर भूमिका या भेटीत झालेल्या व्यापक चर्चांच्या माध्यमातून साकार झाली.
या भेटीदरम्यान मलाबार, RIMPAC, सी ड्रॅगन आणि टायगर ट्रायम्फ यांसारख्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावांमध्ये भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदलाच्या व्यापक कार्यान्वयन होण्याच्या दृष्टीकोनातून विस्तृत चर्चा करण्यात आली. यात दोन्ही नौदलांदरम्यान विविध क्षेत्रांतील आंतरकार्यक्षमता संस्थागत पातळीवर करण्याबाबत नियमित विषयातील तज्ज्ञांची देवाणघेवाणही होते.
आंतरराष्ट्रीय सागर शक्ति परिषदेमध्ये नौदल प्रमुखांनी मानव संसाधन व्यवस्थापनातील आव्हाने, विशिष्ट संदर्भानुसार प्रशिक्षित कर्मचार्यांची भरती आणि ती टिकवून ठेवण्याच्या तसेच अग्निपथ योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि भारतीय नौदलाला लिंगभेदमुक्त पद्धतीने चालविण्याच्या उद्देशाने भारताच्या योजनांबाबत विस्तृत भाष्य केले.
नौदल प्रमुखांच्या अमेरिका भेटीने द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच इंडो-पॅसिफिकमधील विविध भागीदारांसोबत नातेसंबंध दृढ करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्तरावरील आंतरनौदलाच्या सहभागासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली.
***
S.Pophale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960113)
Visitor Counter : 131