अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

चौदा दिवसांच्या अंतरानंतर चंद्रावर पहाट होणार असून अवघ्‍या काही तासांनी चांद्रयान-3 चा दुसरा टप्पा सुरू होण्याची अपेक्षा : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह


इस्रोकडून चांद्रयान-3 च्या सौरऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संप्रेषण पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात असून, तो यशस्वी झाल्यास, ते वैज्ञानिक प्रयोग सुरू ठेवू शकतील : डॉ जितेंद्र सिंह


Posted On: 21 SEP 2023 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023

केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, 14 दिवसांच्या अंतरानंतर चंद्रावर पहाट होणार असून  चांद्रयान-3 चा दुसरा टप्पा आता अवघ्‍या  काही तासांनी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

लोकसभेत "चांद्रयान-3 चे यश आणि अंतराळ क्षेत्रातील आपल्या राष्ट्राची इतर बाबतीत कामगिरी" या विषयावर लोकसभेत आठ तासांहून अधिक चर्चेला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इस्रो चांद्रयानशी संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान -3 चे सौरऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर, त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, हे प्रयत्न यशस्वी झाल्यास, ते हा वैज्ञानिक प्रयोग चालू ठेवू शकतील.

कम्युनिकेशन सर्किट सक्रिय झाल्यानंतर चंद्र मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करणारा भारत जगातील पहिला देश बनेलअसे डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.  

लँडर आणि रोव्हर यांना  महिन्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 4 आणि 2 सप्टेंबर रोजी 14 दिवसांच्या चांद्र रात्रीच्या आधी ’ स्लीप मोड’ मध्ये ठेवण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की रात्री उणे 150 अंश ते दिवसा 100 अंशांपर्यंत तापमानात प्रचंड तफावत असते, हे लक्षात घेऊन, आपण सर्वजण आशा आणि प्रार्थना करूया की सौर बॅटरी आणि सौर पॅनेल, चंद्र मोहिमेच्या अभूतपूर्व अशा दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करण्‍यासाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारने इस्रोसाठीच्या आर्थिक तरतुदीत कपात केली आहे, असा आरोप काही विरोधीपक्ष सदस्यांनी व्यक्त केली होती. हे आरोप खोडून काढत, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, इस्रोचा अर्थसंकल्प 2013-14 मधील 5,168 कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात 142 टक्क्यांनी वाढला असून तो 12,543 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

त्याचप्रमाणे सर्व विज्ञान मंत्रालये आणि विभागांचा अर्थसंकल्प 2013-14 मधील 21, 025 कोटींवरून 2022-23 मध्ये 172 टक्क्यांहून अधिक वाढून 57, 303 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

तमिळनाडूतील थुथुक्कुडी येथे लवकरच नवीन अंतराळ प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.

इस्रोने 1990 पासून प्रक्षेपित केलेल्या 424 परदेशी उपग्रहांपैकी 90 टक्के म्हणजे 389 उपग्रह गेल्या नऊ वर्षांत प्रक्षेपित करण्यात आले आहेत असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

आपण परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आजवर 174 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कमावले आहेत; या 174 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पैकी 157 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी कमाई फक्त गेल्या नऊ वर्षात झाली आहे. गेल्या 30 वर्षात किंवा त्याहून अधिक काळात आजवर केलेल्या युरोपीय उपग्रहांच्या प्रक्षेपणातून एकूण 256 दशलक्ष युरो इतकी कमाई झाली आहे. त्यापैकी 223 दशलक्ष युरो म्हणजे जवळजवळ 90% रक्कम गेल्या नऊ वर्षात कमावले आहे, याचाच अर्थ, उत्पन्नाचे प्रमाण वाढले आहे, वेग वाढला आहे आणि त्यामुळे आपण या क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

 R.Aghor/Suvarna/Shraddha/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1959530) Visitor Counter : 131


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi