सांस्कृतिक मंत्रालय
नवी दिल्लीच्या ‘आयजीएनसीए’मध्ये 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान नदी संस्कृतीवर ‘नदी उत्सव’
Posted On:
21 SEP 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
‘आयजीएनसीए’ म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या ‘नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग (एनएमसीएम) आणि जनपद संपदा विभागातर्फे चौथा 'नदी उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. उद्या, म्हणजे दि. 22 ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत हा उत्सव होणार आहे. यमुना नदीच्या काठावर तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध विषयांवर पर्यावरणवादी आणि अभ्यासकांची अभ्यासपूर्ण चर्चा, चित्रपटांचे प्रदर्शन, नामवंत कलाकारांचे सादरीकरण, कठपुतळ्यांचा कार्यक्रम, वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, अशा विविध कार्यक्रमांचा या महोत्सवामध्ये समावेश असेल.
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या देशात नद्या केवळ पवित्र आणि पूजनीय मानल्या जात नाहीत, तर लाखो भारतीयांच्या भौतिक जीवनाचा त्या आधारही आहेत. सर्व संस्कृती नद्यांच्या काठावर विकसित झाल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र ही कला आणि संस्कृतीला समर्पित संस्था 'नदी उत्सव' मोठ्या प्रमाणावर आयोजित करत आहे.
लोकांमध्ये पर्यावरण आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या उदात्त उपक्रमाची संकल्पना डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी सर्वप्रथम मांडली होती. त्यातूनच 2018 पासून 'नदी उत्सव' सुरू झाला. पहिल्या नदी उत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात झाला. दुसरा 'नदी उत्सव' आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या विजयवाडा शहरात झाला. तिसरा नदी उत्सव बिहारमधील गंगा नदीच्या काठावर वसलेल्या मुंगेर शहरात झाला.
यंदा दिल्लीत होणा-या चौथ्या 'नदी उत्सवा'ला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव उपस्थित राहणार आहेत. तसेच मान्यवर अतिथी म्हणून प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि विद्वान आचार्य, श्रीवत्स गोस्वामी असणार आहेत. तसेच परमार्थ निकेतनचे प्रमुख आध्यात्मिक गुरू स्वामी चिदानंद सरस्वती उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल प्रकाश जोशी यावेळी उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक आयजीएनसीएचे अध्यक्ष पद्मश्री राम बहादूर राय आणि आयजीएनसीएचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी असणार आहेत.
तीन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ 22 सप्टेंबर रोजी सकाळी आयजीएनसीए च्या उमंग सभागृहामध्ये सकाळी 10.30 वाजता होईल. 'नदी उत्सव' कार्यक्रमात प्राचीन ग्रंथांमधील नद्यांचा उल्लेख, नद्यांच्या काठावरील सांस्कृतिक वारसा, लोक-सांस्कृतिक परंपरेतील नद्यांसह अनेक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या तीन दिवसांत 18 चित्रपटही दाखवले जाणार असून, त्यापैकी 6 चित्रपटांची निर्मिती आयजीएनसीए द्वारे करण्यात आली आहे. कठपुतळी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पूरण भट यांच्यावतीने ‘द यमुना गाथा’ सादर करण्यात येणार आहे.
R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959528)
Visitor Counter : 166