गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कचरामुक्त शहराच्या निर्मितीसाठी ठाण्यातील तरुणांनी घेतला पुढाकार

Posted On: 21 SEP 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023

 

स्वच्छतेचा हंगाम कधीच संपत नाही कारण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरामुक्त शहरांच्या स्वप्नपूर्तीत कोणत्याही क्षणी खंड पडणे परवडणारे नाही.  शहरी स्वच्छतेची आवड चिरंतन आहे आणि म्हणूनच स्वच्छता पखवाडा सुरू झाल्यापासून या मोहिमेने देशाचा कानाकोपरा व्यापला आहे. एक प्रकारे  स्वच्छतेसाठी जनआंदोलन सुरू आहे.  देशाच्या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या  राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे.  गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक आहे. गणेशमूर्ती विसर्जन आणि गणेशमूर्ती शक्य तितक्या पर्यावरणपूरक बनवण्याबाबत काळजी व्यक्त करणारी मते मांडली जात  आहेत. हे प्रत्यक्ष साकारण्याच्या कामात आता लहान मुले सहभागी झाली आहेत.

"स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता हीच सेवा 2023" या उपक्रमांतर्गत ठाणे शहरातील 493 शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवणे आणि कचऱ्यापासून सर्वोत्तम कलाकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  एकूण 22,177 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणपतीच्या मूर्ती बनवल्या तसेच शाश्वततेबाबत जनजागृती केली.  या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनापासून आनंद घेतला. 

तसेच, शहर महानगरपालिकेने भारतीय स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत खारफुटी वन स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 2,200 हून अधिक नागरिक सहभागी झाले तसेच त्यांनी खारफुटीचे संरक्षण आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.  स्थानिक सफाईमित्रांनी अधिकाऱ्यांसह खारफुटीच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

ठाण्यात इतर विविध स्वच्छता उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून आला.  उघड्यावर थुंकू नये आणि सार्वजनिक मालमत्तेची विद्रुपीकरण  टाळण्याबाबत  लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात रेड स्पॉट स्वच्छता मोहीम हाती घेतली.  या उपक्रमात एक हजाराहून अधिक ठाणेकर सहभागी झाले होते.  ठाणे महापालिकेने पारसिक टेकडी भागाच्या स्वच्छता मोहिमेचेही आयोजन केले होते. 2,000 हून अधिक नागरिक, शाळकरी मुले, तरुण मुली आणि मुले, पुरुष आणि महिला या स्वच्छता मोहिमेत सामील झाले होते. पारसिक टेकडीचे सुशोभीकरण करून स्थानिक समुदायामध्ये जनजागृती करण्यात ही स्वच्छता मोहीम खूप यशस्वी ठरली. 

भारतीय स्वच्छता लीगच्या पूर्वसंध्येला ठाणे पालिकेने एक मिनिट ठाण्यासाठी ही अभिनव संकल्पना सुरू केली. ठाणे स्वच्छ करण्यासाठी दररोज एक मिनिट समर्पित करण्याची शपथ दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 25,000 शालेय विद्यार्थ्यांसह जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने घेतली.

हे जनआंदोलन शहरी स्वच्छतेचा चेहरामोहरा बदलत आहे आणि स्वच्छतेची भावना जागृत करत आहे.  लिंग, समुदाय, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनाच्या क्षेत्रांतील भेद दूर ठेवून लोक स्वच्छतेची व्यापक चळवळ एखाद्या भव्य उत्सवाप्रमाणे साजरी करत आहेत.

 

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1959459) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil