विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाच्या सहाय्याने (DSIR) 'सर्वसाधारण संशोधन तसेच तंत्रज्ञान विकास केंद्रे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सबलीकरण' या विषयावर, भुवनेश्वर येथे चिंतन शिबिराचे आयोजन

Posted On: 15 SEP 2023 9:21AM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन (DSIR) विभागाच्या वतीने 'सर्वसाधारण संशोधन तसेच तंत्रज्ञान विकास केंद्रे - सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग सक्षमीकरण' (CRTDHs) या उपक्रमाला 2014 पासून सुरूवात झाली. नवनवीन संशोधनाच्या आविष्कारांना चालना देणे, तसेच उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यातील आपापसातला सहयोग सुलभ करणे, हा त्याचा उद्देश आहे. या केंद्रांचा प्राथमिक हेतू वैज्ञानिक ज्ञान, संकल्पना, आविष्कार आणि विक्री योग्य उत्पादने आणि सेवांतील व्यावहारिक उपयोग वाढविणे, हा आहे. हे केंद्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि कंपन्या (एमएसएमई), स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना अत्याधुनिक सुविधा तसेच संसाधनांसाठी सोयी उपलब्ध करून, संशोधन परिणामांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य रुपांत सादर करणे सुलभ करतात.

सीआरटीडीएच कार्यक्रमांतर्गत,डीएसआय आरने इलेक्ट्रॉनिक्स/नूतनीकरणक्षम ऊर्जा, परवडणारऱ्या दरात आरोग्य सुविधा, पर्यावरणीय हस्तक्षेप, कमी किमतीची मशिन्स, आणि नवीन द्रव्ये/रासायनिक प्रक्रिया या पाच क्षेत्रांमध्ये अशाप्रकारची पायाभूत संरचनात्मक परिसंस्था तयार केली आहे आणि विविध ठिकाणच्या सार्वजनिक अनुदान ‌क्षेत्रातील 18 उद्योगांना सीआरटीडीएचने  समर्थन दिले आहे. ही केंद्रे देशभरातील संशोधन संस्था (PFRIs) उद्योगसंस्था यांच्यातील परस्पर संवादाला चालना देण्यासाठी, संशोधक आणि उद्योग तज्ञ यांच्यातील सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण प्रोत्साहित करण्यासाठी, त्याच वेळी महत्त्वपूर्ण सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचा एक भाग म्हणून आणि "आत्मनिर्भर भारत"च्या दिशेने प्रवास करताना आणि आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग/ स्टार्टअप/ नवोन्मेषक यांच्यातील परस्पर संवाद मजबूत करण्यासाठी, सर्व ठिकाणच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (DSIR) विभागांनी 'सर्वसाधारण संशोधन आणि तंत्रज्ञान विकास केंद्रे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सक्षमीकरण - चिंतन शिबिर' आयोजित करण्याची योजना आखली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील सर्व प्रस्थापित उद्योगांच्यासाठी ही शिबिरे विविध हितसंबंधीतांशी सखोल चर्चा आणि सहभागाचे व्यासपीठ म्हणून कार्य करतील. आयआयटी खरगपूर, सीएसआयआर-आय आयटीआर -लखनऊ आणि सीएसआयआर-सीमेरी- दुर्गापूर अशा तीन ठिकाणी या चिंतन शिबिरांचे आयोजन या अगोदर झालेले आहे. आज सीएसआयआर -इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरिअल्स टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर (IMMT) येथे सीआरटीडीएच द्वारे डीएसआयआर सोबत आजचे हे एक दिवसीय चिंतन शिविर आयोजित केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात डीएसआयआरचे सचिव आणि सीएसआयआरचे महासंचालक,डॉ. एन. कलैसेल्वी, आणि सीएसआयआर-आयएमएमटी भुवनेश्वर संचालक डॉ. रामानुज नारायण, यांच्या उद्घाटनपर  भाषणाने होईल. या कार्यक्रमाला डीएसआयआरचे डॉ. विपिन सी शुक्ला, डॉ रणजीत बैरवा आणि डॉ सुमन मुझुमदार आणि पीआय-सीआरटीडीएचचे डॉ. यतेंद्र चौधरी, त्यांच्या समूहासह उपस्थित राहणार आहेत. विविध सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (MSME)  प्रतिनिधी आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स, अशा विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी देखील सीआरटीडीएच मधील संशोधन आणि विकास यांच्यातील प्रयत्नांतून मिळणारे लाभांचा शोध, घेण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होतील.

सहभागी एमएसएमईना भेडसावणार्‍या आव्हानांचा यावेळी शोध घेण्यात येईल आणि संशोधन आणि विकासाला चालना देण्यावर भर देत त्यावर चर्चा करण्यात येईल. सरकारच्या उद्दिष्टांशी संरेखित धोरणे, कार्यक्रम आणि उपक्रमांच्या विकास आणि अंमलबजावणीमध्ये योगदान देऊ शकतील, अशी समस्या सोडवण्याची साधने म्हणून नवीन कल्पना, अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन निर्माण करणे, हा या शिबिराचा उद्देश आहे. चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री असोसिएशनचे प्रतिनिधी एमएसएमईंना त्यांच्या संशोधन आणि विकास पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेबद्दल जागरूक करतील. ही सत्रे देशातील एमएसएमईसाठी संशोधन पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भविष्यवादी तंत्रज्ञान, वर्तमान आणि भविष्यातील संधींसह एमएसएमईंना सक्षम बनवण्यात सीआरटीडीएचची भूमिका अधोरेखित करतील. चिंतन शिबिरच्या शेवटी, एक संवादसत्राचेनियोजन केले आहे, जिथे एमएसएमई/स्टार्टअप्स/इनोव्हेटर्सना भेडसावणाऱ्या सर्व आव्हानांपैकी पाच मोठी आव्हाने ओळखली जातील आणि त्यावरील उपाय शोधले जातील.

एकंदरीत, सखोल चर्चा, गंभीर विश्लेषण आणि धोरणात्मक नियोजनाद्वारे सरकारी अधिकारी आणि भागधारकांच्या एकत्रित, ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील एमएसएमीज, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना भेडसावणाऱ्या आव्हानांसाठी संभाव्य उपायांवर विचारमंथन करणे आणि औद्योगिक संशोधन आणि उत्पादनासाठी भारताला एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या संधींचा लाभ घेणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.

***

S.Pophale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1957655)
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu