पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पंतप्रधान 14 सप्टेंबर 2023 रोजी बीपीसीएलच्या मध्य प्रदेशातील बीना रिफायनरीमधील तेल शुद्धीकरण विस्तारित प्रकल्पाची आणि पेट्रोकेमिकल्स संकुलाची कोनशीला बसवणार

Posted On: 12 SEP 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 सप्टेंबर 2023 रोजी बीपीसीएलच्या मध्य प्रदेशातील बीना रिफायनरीमधील पेट्रोकेमिकल्स संकुल तसेच तेल शुद्धीकरण विस्तारित प्रकल्पाच्या कामाची  कोनशीला बसवण्यात येणार आहे.

नव्या भारताच्या आकांक्षांना अनुसरुन बीपीसीएल कंपनीने मध्य प्रदेशातील बीना सागर येथील अत्याधुनिक पेट्रोकेमिकल्स संकुल उभारण्याची कल्पना मांडली आहे. या प्रकल्पासाठी होणाऱ्या 49,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे, संपूर्ण बुंदेलखंड भागात समृद्धी तसेच भरभराट  येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे बीना रिफायनरीची क्षमता 11 एमएमटीपीए पर्यंत वाढणार असून त्यामुळे 2200 किलो टनहून अधिक प्रमाणात पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती होईल. हा संपूर्ण प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार आहे. बीना रिफायनरीमध्ये निर्माण झालेल्या नॅप्था, एलपीजी, केरोसीन इत्यादी घटकांचा वापर इथिलीन क्रॅकर उद्योग संकुल करणार आहे.

हे पेट्रोकेमिकल संकुल पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये बुंदेलखंड भागातील तरुण उद्योजकांना अनेकानेक, वैविध्यपूर्ण रोजगार संधी उपलब्ध होतील. या पेट्रोकेमिकल संकुलामुळे प्लास्टिक, पाईप्स, पॅकेजिंगचे साहित्य, प्लास्टिक शीट्स, वाहनांचे सुटे भाग, वैद्यकीय उपकरणे, साच्यात घडवलेले फर्निचर तसेच घरगुती आणि औद्योगिक वापराच्या इतर अनेक वस्तूंच्या विविध प्रक्रिया क्षेत्रात व्यावसायिक उत्पादन कारखाने उभारण्याचे मार्ग खुले होणार आहेत.

या प्रकल्पातील गुंतवणुकीतून या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने 1 लाखांहून अधिक रोजगार संधींची निर्मिती होणार असून त्यासोबतच दर वर्षी 20,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत देखील होणार आहे.

वरील लाभांसह, या संकुलामध्ये पेट्रोकेमिकल्सचे प्रक्रिया उद्योग, इतर सहाय्यक व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधींच्या निर्मितीची क्षमता असणार आहे.

भारताला 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दिशेने वाटचाल करत, देशात रसायने तसेच पेट्रोकेमिकल्स निर्मितीचे जागतिक केंद्र उभारुन हा प्रकल्प देशाच्या आकांक्षित आत्मनिर्भर भारत संकल्पनेला अनुसरून कार्य करणार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956768) Visitor Counter : 109