माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डीडी स्पोर्ट्स ही वाहिनी आता झाली आहे डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी
Posted On:
06 SEP 2023 7:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2023
डीडी स्पोर्ट्स ही दूरचित्रवाणी वाहिनी आता डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी झाली आहे. देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय-डेफिनिशन वाहिनीची भर घातली असून सध्या सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धांच्या प्रसारणाने आता डीडी स्पोर्ट्स एचडी या वाहिनीच्या कार्याची सुरुवात होत आहे. यामुळे देशभरातील क्रीडारसिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणीच केवळ पूर्ण होणार नसून, बदलत्या काळानुसार डीडी वाहिन्यांचे संपूर्ण जाळे परिवर्तीत करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक निर्णायक पाऊल आहे.
डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी आता क्रीडाप्रेमींची पहिल्या पसंतीची वाहिनी होणार आहे. या प्रेक्षकांना आता महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रसारण हाय-डेफिनिशन क्षमतेसह पाहायला मिळेल. येत्या काही महिन्यांमध्ये डीडी स्पोर्ट्स ही वाहिनी नवनवीन कार्यक्रमांसह प्रेक्षकांसमोर येणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये डीडी स्पोर्ट्स वाहिनीने साहित्याच्या सादरीकरणाच्या दृष्टीने अनेक अभिनव आणि नव्या दृष्टीकोनांसह नवे कार्यक्रम सुरु केले आहेत. नुकत्याच संपलेल्या भारत विरुध्द वेस्ट इंडीज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेच्या प्रसारणामध्ये दूरदर्शनने हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील समालोचनासह, तमिळ,कन्नड,बंगाली,तेलुगु तसेच भोजपुरी या भाषांमधील समालोचन देखील उपलब्ध करून दिले होते. या वाहिनीने इतर अनेक स्त्रोतांसह एनबीए,पीजीटीए यांसारख्या क्रीडा क्षेत्रातील संस्थांशी सहयोगी संबंध प्रस्थापित केले आहेत.
येत्या काही महिन्यांमध्ये असेच इतर अनेक करार होणार आहेत ज्यांच्यामुळे डीडी स्पोर्ट्स ही वाहिनी क्रीडा विश्वातील अत्यंत आघाडीची प्रसारण वाहिनी म्हणून स्वतःचे स्थान पक्के करेल.
डीडी स्पोर्ट्स या वाहिनीच्या कार्याची सुरुवात 18 मार्च 1998 रोजी झाली. सुरुवातीला या वाहिनीद्वारे 6 तासांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचे प्रसारण होत असे, पुढे 1999 मध्ये हा कालावधी वाढवून 12 तासांचा करण्यात आला. 1 जून 2000 पासून डीडी स्पोर्ट्स या वाहिनीचे कामकाज अहोरात्र उपग्रह वाहिनीच्या स्वरुपात सुरु झाले. डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनीच्या कार्याचा प्रारंभ करण्याच्या निर्णयामुळे, ही वाहिनी म्हणजे, महत्त्वाच्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रमांचे तसेच खेलो इंडिया क्रीडास्पर्धा, हिवाळी स्पर्धा आणि दिव्यांगांसाठीच्या क्रीडास्पर्धांसह इतर अनेक स्पर्धांसारख्या मूलभूत परिवर्तनशील घटनांचे प्रसारण एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची सोय झाली आहे.
डीडी स्पोर्ट्स ही वाहिनी सध्या डीडी फ्री डिश सेवेतील 079 क्रमांकाच्या वाहिनीवर उपलब्ध आहे आणि लवकरच ही वाहिनी इतर मंचांवर देखील उपलब्ध होईल.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955260)
Visitor Counter : 177