कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चांद्रयान -3 आणि आदित्य-एल 1 या मोहिमा भारताच्या पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळातील प्रगतीपथाचे नेतृत्व करणाऱ्या ठरतील: डॉ जितेंद्र सिंह


अंतराळ मोहिमांच्या बाबतीत, नासा, रॉसकॉसमॉस अशा अंतराळ संस्थांशी स्पर्धा करण्याची क्षमता आता इस्रोकडे आहे: डॉ जितेंद्र सिंह

डॉ जितेंद्र सिंह म्हणतात, या युगाची ‘मोदी युग’ अशी यथोचित ओळख; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांचे स्वागत असून, चंद्रयान-3 आणि आदित्य-एल 1 ही त्या धोरणांचीच परिणती

Posted On: 03 SEP 2023 6:10PM by PIB Mumbai


चांद्रयान-3 आणि आदित्य-एल 1 या मोहिमा, भारताच्या पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळातील प्रगतीपथाचे नेतृत्व करणाऱ्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

जम्मूत उधमपूर जिल्ह्यात टिकरी-वन बी पंचायत इथे 'मेरी माटी मेरा देश'(माझी माती माझा देश) मोहिमेची सुरुवात करताना ते बोलत होते. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरातून माती आणि तांदूळ यांनी भरलेले कलश घेऊन, देशभरात अमृत कलश यात्रांची सुरुवात होत आहे. या यात्रा म्हणजे मातृभूमीच्या भरभराटीसाठी जनतेच्या योगदानाचे प्रतीक आहेत, असे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

भारताने अंतराळ मोहिमांमध्ये अलीकडे मिळवलेले देखणे यश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाले आहे. पंतप्रधानांनी, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी नवीन क्षितिजे खुली केली आहेत आणि आता 'आकांक्षां पुढती गगनही ठेंगणे' ही उक्ती भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी खरी ठरली आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी, या मेरी माटी मेरा देशमोहिमेची सुरुवात करताना सांगितले.

भारताने अंतराळ मोहिमांच्या बाबतीत घेतलेल्या हनुमान उडीची, गेली नऊ वर्षे, साक्षीदार ठरली आहेत आणि त्यामुळे याबाबतीत नासा, रॉसकॉसमॉस अशा आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांशी स्पर्धा करण्याची क्षमता राखत, भारत त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, असे डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. या जागतिक अंतराळ संशोधन संस्था आता अंतराळ मोहिमांसाठी इस्रोशी सहयोग साधत आहेत असेही ते पुढे म्हणाले.

भारताने मर्यादित साधन संपत्ती आणि माफक खर्चात, मनुष्यबळ आणि मनुष्य क्षमतेच्या वापराबाबत  आपले प्रभुत्व जगासमोर सार्थपणे प्रदर्शित केले आहे आणि त्यामुळे भारत जगात एक आघाडीचे राष्ट्र  आणि वैज्ञानिक-आर्थिक शक्ती म्हणून नावारूपाला आला आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी पुढे असेही सांगितले की सामूहिक योगदानासह एकत्रित प्रयत्न करण्यासाठी सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासारखे अनेक प्रगतीशील धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल, संपूर्ण जग या सर्व यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत आहे.

भारताला 2047 साली यशोशिखरावर विराजमान झालेले पाहण्यासाठी, अमृत कलश यात्रांमध्ये सहभागी व्हावे, पंच प्रणांची शपथ घ्यावी, भारताची प्रगती आणि विकासासाठी वचनबद्ध व्हावे अशी विनंती सुद्धा डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या कार्यक्रमात लोकांना केली.

या कार्यक्रमाला या भागातील पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींसह जिल्हा विकास परिषदेचे (डी डी सी) अध्यक्ष लालचंद आणि उधमपूरच्या उपायुक्त सलोनी राय सुद्धा उपस्थित होत्या.

***

R.Aghor/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954513)