नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
29 AUG 2023 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
भारत सरकार आणि न्यूझीलंड सरकारने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये नवे मार्ग वेळापत्रक, कोड शेअरींग सेवा, वाहतुकीचे अधिकार आणि क्षमता अधिकार यांचा समावेश असेल.
भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि निर्यात विकास , कृषी मंत्री, जैवसुरक्षा मंत्री, भू संसाधन मंत्री आणि ग्रामीण समुदाय मंत्री डॅमियन ओ' कॉनर यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल आणि न्यूझीलंडचे उच्चायुक्त डेव्हिड पाइन यांनी स्वाक्षरी केली.
आज स्वाक्षरी झालेल्या या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
या सामंजस्य करारानुसार, न्यूझीलंडची नियुक्त विमान कंपनी कोणत्याही प्रकारच्या विमानासह भारतातील नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई हैदराबाद आणि कोलकाता या सहा ठिकाणांपर्यंत किंवा इथून न्यूझीलंडमध्ये कितीही वेळा विमान सेवा चालवू शकतात.
याप्रसंगी बोलताना ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले, “भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान सेवेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे या दोन्ही देशांदरम्यान हवाई वाहतूक आणखी वाढण्याची संधी निर्माण झाली आहे. मुक्त अवकाशाचे धोरण यात नमूद केले आहे. विमान उतरण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आम्ही मध्यवर्ती ठिकाणांची संख्या देखील वाढवली आहे.”
भारताची नियुक्त विमान कंपनी न्यूझीलंडमधील ऑकलंड, वेलिंग्टन, क्राइस्टचर्च आणि भारत सरकारद्वारे सुचवण्यात येणाऱ्या आणखी तीन ठिकाणांहून /ठिकाणांकडे कोणत्याही प्रकारच्या विमानासह कितीही वेळा विमान सेवेचे परिचालन करू शकते.
दोन्ही देशांच्या नियुक्त विमान कंपन्या कोणत्याही प्रकारच्या विमानासह सर्व प्रकारच्या कार्गो सेवा एकमेकांच्या देशात कोणत्याही स्थानापासून किंवा कोणत्याही मध्यवर्ती स्थानावरून आणि वेळापत्रकात निर्दिष्ट स्थानांखेरीज देखील विमान सेवा चालवू शकतात.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953345)
Visitor Counter : 166