वस्त्रोद्योग मंत्रालय
तांत्रिक वस्त्रोद्योगांसाठी समर्पित स्टार्टअप मार्गदर्शक तत्त्वांना केंद्र सरकारची मंजुरी
राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने 26 अभियांत्रिकी संस्थांना दिली मंजुरी
Posted On:
29 AUG 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
वस्त्रोद्योग मंत्रालयाने तांत्रिक वस्त्रोद्योगांसाठी स्टार्टअप मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केली आहेत तसेच तांत्रिक वस्त्रोद्योगांमधील होतकरू संशोधकांना संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (GREAT) म्हणून 18 महिन्यांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव राजीव सक्सेना यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या महत्त्वाच्या घडामोडींवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.
तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यावर प्रामुख्याने भर असणाऱ्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यावसायिकीकरणासह तंत्रज्ञान आणि उत्पादनांमध्ये मूळ नमुना तयार करण्यासाठी व्यक्ती आणि कंपन्यांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगांमधील होतकरू संशोधकांना संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (GREAT) संबंधी मार्गदर्शक तत्वांमध्ये ऍग्रो -टेक्सटाइल्स, बिल्डिंग-टेक्सटाइल्स, जिओ-टेक्सटाइल्स, होम-टेक्सटाइल्स, मेडिकल-टेक्सटाइल्स, मोबाइल-टेक्सटाइल्स, पॅकेजिंग- टेक्सटाइल्स, प्रोटेक्टिव्ह-टेक्सटाइल्स, स्पोर्ट्स-टेक्सटाइल्स; उच्च-कार्यक्षमतेच्या फायबर आणि संमिश्रांचा विकास; टिकाऊ आणि पुनर्वापर करण्याजोगे कापड; कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D/4D प्रिंटिंग आणि रॅपिड प्रोटोटाइपिंगचा वापर असलेले स्मार्ट टेक्सटाइल; आणि स्वदेशी यंत्रे/उपकरणे/साधने यांचा विकास यांसारख्या तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.
इनक्यूबेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी, मंत्रालय इनक्यूबेटर्सना एकूण अनुदानाच्या 10% अतिरिक्त अनुदान देणार आहे . प्रकल्पाप्रति प्रामाणिकता आणि वचनबद्धता दृढ करण्यासाठी, इनक्यूबेटीच्या निधीच्या 10% किमान गुंतवणूक दोन समान हप्त्यांमध्ये अनिवार्य केली आहे. स्टार्टअप मार्गदर्शक तत्त्वे (GREAT) भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, विशेषत: बायो-डिग्रेडेबल आणि शाश्वत वस्त्र, उच्च-कार्यक्षमता आणि वैशिष्ट्यपूर्ण फायबर, स्मार्ट टेक्सटाइल्स यांसारख्या महत्वपूर्ण उप-विभागांमध्ये आवश्यक प्रोत्साहन देतील.
मंत्रालयाने 26 संस्थांना त्यांच्या प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मंजुरी दिली आहे. मंत्रालयाने 26 संस्थांच्या अर्जांना तसेच प्रमुख विभागांमध्ये /प्राविण्य मिळवण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योग अभ्यासक्रम/पेपर्स तसेच तांत्रिक वस्त्रोद्योगात नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करायलाही मंजुरी दिली आहे.
एकूण 151.02 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये सरकारी संस्थांकडून 105.55 कोटी रुपयांचे 15 अर्ज आहेत आणि खाजगी संस्थांचे 45.47 कोटी रुपयांचे 11 अर्ज आहेत.
या योजनेंतर्गत निधी पुरवला जाणार्या काही प्रमुख संस्थांमध्ये आयआयटी दिल्ली, एनआयटी जालंधर, एनआयटी दुर्गापूर, एनआयटी कर्नाटक, एनआयएफटी मुंबई, आयसीटी मुंबई, अण्णा विद्यापीठ, पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, एमिटी युनिव्हर्सिटी आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यमान अभ्यासक्रमांचा दर्जा उंचावण्यासाठी बहुतांश निधी दिला जाणार आहे
याशिवाय, भारतात तांत्रिक वस्त्रोद्योग शिक्षणात शैक्षणिक संस्थाना सक्षम बनवण्यासाठी मंत्रालय पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. तांत्रिक कापडाची गुणवत्ता आणि नियमन याबाबत मंत्रालयाने याआधीच 31 तांत्रिक वस्त्र उत्पादनांसाठी 2 गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित केले आहेत, ज्यात 19 जिओटेक्स्टाइल आणि 12 संरक्षणात्मक वस्त्रे यांचा समावेश असून ती 7 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील. याशिवाय, 22 ऍग्रो टेक्स्टाइल आणि 6 मेडिकल टेक्सटाइल्ससह 28 उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश देखील जारी करण्याच्या अंतिम टप्प्यात असून सप्टेंबर 2023 मध्ये जारी केले जाण्याची शक्यता आहे.
गुणवत्ता नियंत्रण आदेश चा अर्थव्यवस्था, उद्योग आणि समाजावर होणारा व्यापक प्रभाव लक्षात घेऊन मंत्रालय उद्योगांबरोबर यासंबंधित विविध प्रकारची सल्लामसलत करत आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1953202)
Visitor Counter : 250