संरक्षण मंत्रालय
इजिप्तमधील ब्राइट स्टार- 23 या सरावासाठी भारतीय सैन्य दलाची पथक रवाना
Posted On:
29 AUG 2023 2:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
इजिप्तमधील मोहम्मद नगुइब सैन्यतळावर 31 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “ब्राइट स्टार- 23” या सरावासाठी 137 जवानांचा समावेश असलेले भारतीय सैन्यदलाचे पथक रवाना झाले आहे. हा बहुराष्ट्रीय तिन्ही सेवांचा संयुक्त लष्करी सराव आहे ज्याचे नेतृत्व अमेरिकेचे यूएस सेंटकाॅम (US CENTCOM)आणि इजिप्शियन सैन्यदल करणार आहे. 1977च्या कॅम्प डेव्हिड कराराअंतर्गत अमेरिका आणि इजिप्त दरम्यान द्विपक्षीय द्वैवार्षिक प्रशिक्षण सराव म्हणून सुरुवातीला या सरावाची संकल्पना मांडण्यात आली.या सरावाची पहिली फेरी इजिप्तमध्ये 1980 मध्ये आयोजित करण्यात आली होती. 1995 पासून इतर राष्ट्रांना सहभागी करण्यासाठी या सरावांचा विस्तार करण्यात आला. यापूर्वीचा ब्राईट स्टार हा सराव 2021 मध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये 21 देशांच्या सैन्याने भाग घेतला होता.
या वर्षी 34 देश ब्राइट स्टार- 23 या सरावात सहभागी होत आहेत.मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव असेल. भारतीय सशस्त्र दल प्रथमच एकूण 549 जवानांसह ब्राईट स्टार सरावात सहभागी होत आहे. 23 जाट बटालियनच्या तुकडीने यात भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व केले आहे.
या सरावात जागतिक शांतता राखण्याच्या उद्देशाने नव्याने तयार होणाऱ्या दहशतवादी संकटांविरुध्द लढणे आणि सहभागी राष्ट्रांमधील प्रादेशिक भागीदारी वाढवणे यावर लक्ष केंद्रित केलेले असून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रशिक्षण सरावांचा यात समावेश असेल. विविध क्षेत्रीय आणि परिस्थितीजन्य प्रशिक्षण सरावाव्यतिरिक्त, ब्राइट स्टार- 23 कवायतींमध्ये सामरिक प्रसंगाधारित आणि सर्व शस्त्रास्त्रांद्वारे थेट गोळीबार सरावांचा समावेश असेल. यावेळी समकालीन विषयांवर चर्चासत्र आयोजित केली असून सायबरसुरक्षेवरील नियोजित चर्चासत्रात भारतीय सशस्त्र सेना हे प्रमुख दल म्हणून सहभागी होणार आहे.
ब्राइट स्टार- 23 या सरावामुळे भारतीय सैन्याला संरक्षण सहकार्य वाढवण्यासोबतच इतर देशांच्या सैन्यांसोबत सर्वोत्तम सराव आणि अनुभव सामायिक करण्याची उत्तम संधी प्रदान करेल.भारतीय सैन्य या सरावातून समृद्ध व्यावसायिक अनुभव मिळण्याची अपेक्षा करत आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953182)
Visitor Counter : 172