युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

पटियाला येथील एनआयएसमध्ये 13 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन


केंद्रीय मंत्र्यांनी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंशीही साधला संवाद

Posted On: 28 AUG 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज  पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेला (एनआयएस) भेट दिली. एनआयएसचे वरिष्ठ कार्यकारी संचालक कर्नल राज सिंह  बिश्नोई आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. क्रीडा  पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने अनेक नूतनीकरण प्रकल्पांचे उद्घाटन करण्याबरोबरच त्यांनी मुष्टियुद्ध, अॅथलेटिक्स आणि कबड्डी या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला.

  

केंद्रीय मंत्र्यांनी 13 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले यात अत्याधुनिक वेटलिफ्टिंग हॉल, तंदुरुस्ती केंद्र , आधुनिक वसतिगृहे आणि अतिथीगृह यांचा समावेश आहे. भारतीय वेट लिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव हे देखील उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

अनौपचारिक संवादात क्रीडा मंत्र्यांनी खेळाडूंशी त्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या  तयारीबद्दल चर्चा केली आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी  त्यांची कौशल्ये आणि मानसिक लवचिकता सुधारण्यासाठी प्रेरणा दिली. तयारीदरम्यान खेळाडूंना येणाऱ्या प्रत्येक  लॉजिस्टिक समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली.

  

सुधारित सुविधा आणि पायाभूत सुविधांबद्दल खेळाडूंनी  समाधान व्यक्त केले.यंदा आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पदकतालिकेत नवी उंची गाठण्याच्या भारताच्या क्षमतेवर अनुराग ठाकूर यांनी विश्वास व्यक्त केला. ठाकूर म्हणाले की,  “गेल्या काही वर्षांपासून भारताने सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  आज आपले खेळाडू जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की ,आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारत पदकतालिकेत उत्कृष्ट कामगिरी करेल.”

  

राष्ट्राला अभिमान वाटावा म्हणून झटणाऱ्या क्रीडापटूंसोबत मंत्र्यांनी साधलेल्या संवादाने क्रीडापटूंमध्ये दृढनिश्चय आणि नवी ऊर्जा संचारली. तत्पूर्वी आज सकाळी केंद्रीय मंत्र्यांनी आयएएसईआर मोहाली येथील रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्रे प्रदान केली.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1953065) Visitor Counter : 106