संरक्षण मंत्रालय
भारत आणि बांगलादेश यांच्यात संरक्षणविषयक पाचव्या वार्षिक चर्चेचे ढाका येथे आयोजन
Posted On:
28 AUG 2023 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
ढाका येथे आज 28 ऑगस्ट 2023 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाचवी संरक्षणविषयक वार्षिक चर्चा पार पडली. दिनांक 27 आणि 28 ऑगस्ट 2023 या दोन दिवसांसाठी बांगलादेश दौऱ्यावर असलेले केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर आरमाने यांनी त्यांचे समकक्ष असलेले बांगलादेशच्या सशस्त्र दल विभागातील मुख्य दल अधिकारी लेफ्टनंट जनरल वाकेर-उज-झमन यांच्यासह या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषविले.
भारत आणि बांगलादेश दरम्यान आयोजित होणारी वार्षिक संरक्षणविषयक चर्चात्मक बैठक ही दोन्ही देशांच्या दरम्यान असलेली सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे. आज झालेल्या चर्चेमध्ये, दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान भविष्यकालीन संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी अधिक भर दिला.
या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्यविषयक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि संरक्षणविषयक सहकार्यातील दोन्ही देशांच्या वाढत्या सहभागाबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान देखील व्यक्त केले. बैठकीमध्ये, विद्यमान द्विपक्षीय सरावांबाबत देखील चर्चा झाली आणि दोन्ही नेत्यांनी या सरावांचे स्वरूप आणखी सखोल करण्याबाबत संमती दर्शवली.
केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर आरमाने आणि लेफ्टनंट जनरल वाकेर-उज-झमन यांनी ही चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याची माहिती दिली आणि पाचव्या संरक्षणविषयक वार्षिक चर्चेत साध्य झालेल्या सामायिक मतैक्याच्या आधारावर परस्परांच्या उपक्रमातील सहभाग पुढे सुरु ठेवण्याबाबत दोन्ही देश उत्सुक आहेत यावर अधिक भर दिला.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची सशस्त्र दले विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य असेच सुरु ठेवण्याबाबत आशादायी आहेत आणि सतत वाढत असलेले उपक्रम हे या दोन्ही देशांतील संबंधांच्या भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक चिन्ह आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952986)
Visitor Counter : 176