पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्‍ली इथे झालेल्‍या बी 20 शिखर परिषद भारत 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 27 AUG 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्ट 2023

 

बंधू आणि भगिनींनो

आदरणीय निमंत्रित

नमस्कार

तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत असो

मित्रांनो,

आपण सर्व जण उद्योग जगतातील अग्रणी नेते अशा वेळी भारतात आला आहात , जेव्हा संपूर्ण देशभरात एखाद्या महोत्सवाप्रमाणे वातावरण आहे. भारतात दर वर्षी येणारा महोत्सवाचा कालावधी काहीसा आधीच सुरु झाला आहे.  हा सणासुदीचा काळ असा असतो, जो आमचा समाज देखील साजरा करतो आणि आमचे उद्योग देखील.. आणि या वर्षी हा 23 ऑगस्ट पासूनच सुरु झाला आहे. आणि हा उत्सव आहे चंद्रावर चांद्रयान पोहोचण्याचा. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेत आमची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची अत्यतं महत्वपूर्ण भूमिका आहे. मात्र या मोहिमेला भारतातील उद्योगांनी देखील मोठे योगदान दिले आहे. चांद्रयानासाठी वापरलेले अनेक घटक आणि भाग आमच्या उद्योगांनी, आमच्या खाजगी कंपन्यांनी, आमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आवश्यकतेनुसार तयार करून अगदी वेळेत उपलब्ध करून दिले. म्हणजेच हे यश, विज्ञान आणि उद्योग या दोघांचे आहे. आणि महत्वाचे म्हणजे या वेळी हे यश भारतासोबतच संपूर्ण जगात साजरे केले जात आहे. हा उत्सव देशाच्या विकासाला गती देण्याबद्दल साजरा केला जात आहे आणि हा सोहळा एक जबाबदार अंतराळ कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आहे. हा उत्सव नवोन्मेषाचा आहे. हा सोहळा अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणि समानता आणण्याचा आहे. आणि या बी 20 शिखर परिषदेची संकल्पना देखील तीच आहे - RAISE अर्थात जबाबदारी, वेग, नवोन्मेष, शाश्वतता  आणि समानता. आणि, हे मानवतेबद्दल आहे. हे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याबद्दल आहे.

मित्रांनो,

तशी तर बी 20 शिखर परिषदेची संकल्पना RAISE ही आहे. आय म्हणजे इनोव्हेशन अर्थात नवोन्मेष. मात्र मी यामध्ये इनोव्हेशन सोबतच आणखी एक आय पाहतो आहे. आणि तो म्हणजे इन्कलुसिव्हनेस अर्थात सर्वसमावेशकता. आम्ही याच दृष्टिकोनातून आफ्रिकन युनियन ला देखील जी 20 च्या स्थायी सदस्यत्वासाठी निमंत्रित केले आहे. बी 20 मध्ये सुद्धा आफ्रिकी अर्थव्यवस्थेच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. या मंचाचा  दृष्टिकोन जितका व्यापक आणि सर्वसमावेशी असेल तितकाच त्याचा प्रभाव देखील लक्षणीय असेल, अशी भारताची धारणा आहे. यामुळे जागतिक स्तरावरील वित्तीय संकटांना हाताळण्यात, वृद्धीला शाश्वत स्वरूप देण्यात आणि येथे घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत आपल्याला अधिक यश मिळेल.

मित्रांनो,

जेव्हा कोरोना सारखे महासंकट येते तेव्हा ते आपल्याला काहीना काही शिकवून जाते. दोन तीन वर्षांपूर्वी आपण जगातील सर्वात मोठी महामारी, अगदी शतकातून एकदा येणाऱ्या सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडलो आहोत. या संकटाने जगातील प्रत्येक देशाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यावसायिक घराण्याला, प्रत्येक कॉर्पोरेट घटकाला धडा दिला आहे. धडा असा आहे की आता आपल्याला सर्वात जास्त गुंतवणूक करायची आहे ती म्हणजे परस्पर विश्वासाची गुंतवणूक. कोरोनाने जगातील हा परस्पर विश्वास नष्ट केला आहे. आणि अविश्वासाच्या या वातावरणात जो देश तुमच्यासमोर पूर्ण संवेदनशीलतेने, नम्रतेने, विश्वासाचा झेंडा घेऊन उभा आहे तो म्हणजे भारत. 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या संकटात भारताने जगाला दिलेली गोष्ट म्हणजे विश्वास, ट्रस्ट, परस्पर विश्वास.

कोरोना काळात जेव्हा जगाला गरज होती, तेव्हा जगाची फार्मसी म्हणून भारताने 150 हून अधिक देशांना औषधे पुरवली. जेव्हा जगाला लसींची आवश्यकता होती, तेव्हा भारताने लसींचे उत्पादन वाढवून कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले. भारताची लोकशाही मूल्ये, भारताच्या कृतीतून दिसून येतात, भारताच्या प्रतिसादातून दिसून येतात. भारताची लोकशाही मूल्ये, देशातील 50 हून अधिक शहरांमध्ये झालेल्या जी -20 बैठकीत दिसून येतात. आणि म्हणूनच भारतासोबतची तुमची भागीदारी अत्यंत महत्वाची आहे. आज भारतात जगातील सर्वाधिक युवा प्रतिभा आहे. 'इंडस्ट्री 4.0'च्या या युगात आज भारत डिजिटल क्रांतीचा चेहरा बनला आहे. भारतासोबतची तुमची मैत्री जितकी गाढ होईल तितकी दोघांनाही अधिक समृद्धी लाभेल. क्षमतांचं रूपांतर समृद्धीमध्ये, अडचणीचं रूपांतर संधीमध्ये, आकांक्षांचं रूपांतर यशस्वी कामगिरीमध्ये , करण्याचं सामर्थ्य व्यवसायात असतं, हे तुम्ही जाणताच. उद्योग लहान असो किंवा मोठा, स्थानिक असो किंवा जागतिक, प्रत्येकाची प्रगती तो घडवू शकतो, त्यामुळे जागतिक विकासाचे भवितव्य व्यवसायाच्या भविष्यावर अवलंबून आहे.

मित्रांनो,

कोविड 19 च्या आधीचे जग आणि कोविड 19 च्या नंतरचे जग यात खूप परिवर्तन झाले आहे. आपण अनेक गोष्टींमध्ये अपरिवर्तनीय बदल पाहत आहोत. आता, कदाचित जग पुन्हा कधीच जागतिक पुरवठा साखळी त्याच प्रकारे पाहू शकणार नाही. पूर्वी असे म्हटले जात होते की जोपर्यंत जागतिक पुरवठा साखळी कार्यक्षम आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखे काही नाही. पण अशी पुरवठा साखळी, म्हणजे अशी पुरवठा साखळी कार्यक्षम म्हणता येईल का जेव्हा जगाला त्याची सर्वात जास्त गरज असते त्याचवेळी ती खंडित होते.   म्हणूनच, आज जेव्हा जग या प्रश्नाशी झुंजत आहे, तेव्हा मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की या समस्येचे समाधान भारताकडे आहे. एक कार्यक्षम आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यात भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. आणि यासाठी जागतिक उद्योगांप्रती  असलेली आपली जबाबदारी आपण सर्वाना पार पाडावी लागेल,  त्यासाठी सर्वांनी मिळून पुढे मार्गक्रमण करू या.

मित्रांनो,

जी 20 सदस्य राष्ट्रांमध्ये बी 20, संवाद आणि चर्चेचा एक उत्साही आणि चैतन्यदायी मंच म्हणून उदयाला येत असल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. त्यामुळेच जेव्हा आपण या मंचावर जागतिक आव्हानांवरील उपाययोजनांबद्दल चर्चा करतो त्यावेळी, शाश्वतता हा एक महत्वाचा विषय आहे. आपल्या सर्वाना हे लक्षात घ्यावे लागेल की शाश्वतता हा विषय केवळ नियम आणि कायद्यांच्या पातळीवर मर्यादित न राहता तो दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनायला हवा, जीवनाचा भाग बनायला हवा. माझा असा आग्रह आहे की जागतिक उद्योगांनी  याही पुढे जाऊन अजून एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. शाश्वतते मध्ये एक संधी असून ते एक व्यवसायाचे प्रारूप देखील आहे. आता मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला मिलेट्स किंवा श्री अन्नाबाबतचे उदाहरण समजेल. संयुक्त राष्ट्र हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करत आहे. भरड धान्य हे पौष्टिक धान्य असून  पर्यावरणास अनुकूल आहे आणि लहान शेतकर्‍यांना देखील ते आधार देते. तसेच यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देखील अमाप संधी आहेत. म्हणजेच जीवनशैली आणि अर्थव्यस्था या दोघांसाठी प्रत्येक दृष्टीने ही विजयी स्थिती आहे. याच प्रकारे आपण चक्राकार अर्थव्यवस्थेला देखील पाहू शकतो. यामध्ये देखील व्यवसायासाठी असीम क्षमता आहेत. भारतात आपण हरित ऊर्जेवर खूप भर देत आहोत. भारताला सौरऊर्जा क्षमतेत जे यश मिळाले आहे, त्याची पुनरावृत्ती ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातही व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. जगाला सोबत घेऊन जाण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या रूपानेही दिसून येत आहे.

मित्रांनो,

कोरोना पश्चात जगात आजकाल आपण पाहत आहोत की सगळे जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले आहेत. जेवणाच्या टेबलावर आरोग्याविषयीची जाणीव लगेच दिसून येते, जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो, काय खातो, काय करतो, या प्रत्येक गोष्टीत आपण सजगतेने पाहतो की त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल. प्रत्येक जण विचार करतो की मला काही त्रास तर होणार नाही ना, भविष्यात माझ्या आरोग्यावर याचा काही परिणाम तर होणार नाही ना.  केवळ वर्तमान काळात नव्हे तर भविष्यात याचा काय परिणाम होईल याबद्दल देखील आपण आता विचार करू लागलो आहोत. माझा असा विश्वास आहे, की उद्योग आणि समाजाला हीच विचारसरणी आपल्या ग्रहाच्या संदर्भात जोपासायला  हवी. जेवढी काळजी मला माझ्या आरोग्याची आहे आणि ती माझ्या दैनंदिन जीवनात माझी मोजपट्टी असेल तर माझ्या दैनंदिन जीवनातील कृतींचा  या ग्रहावर  काय परिणाम होईल, त्याच्या प्रकृतीवर याचा काय प्रभाव पडेल हा विचार करणे, ही सुद्धा आपली जबाबदारी आहे.

प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा आपल्या पृथ्वीवर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे. मिशन LiFE अर्थात पर्यावरणासाठी जीवनशैली यामागे हीच भावना आहे. पृथ्वीसाठी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा एक गट किंवा समूह तयार करणे, एक चळवळ निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. जीवनशैलीशी निगडित प्रत्येक निर्णयाचा उद्योग जगतावर निश्चितपणे काही परिणाम होतो. जेव्हा जीवनशैली आणि उद्योग पृथ्वीसाठी अनुकूल असतील तेव्हा अनेक समस्या आपोआप कमी होतील.

पर्यावरणाला अनुसरून आपले जीवन आणि उद्योग यांचा कसा ताळमेळ घालता येईल यावर आपल्याला भर द्यावा लागेल. भारताने उद्योगांसाठी ग्रीन  क्रेडिट आराखडा तयार केला आहे. आपण इतके दिवस कार्बन क्रेडिटमध्येच अडकलो आहोत मात्र काही लोक कार्बन क्रेडिटचा आनंदही लुटत आहेत. मी जगासमोर ग्रीन क्रेडिटची संकल्पना घेऊन आलो आहे. या आराखड्यात पृथ्वीच्या दृष्टीने सकारात्मक कृतींवर भर दिला आहे. जगभरातील सर्व दिग्गज व्यवसायायिकांनी भारताच्या या प्रयत्नांना साथ द्यावी आणि या उपक्रमाला जागतिक चळवळ बनवावं असे आवाहन मी करतो.

मित्रहो,

आपल्याला व्यवसायाच्या पारंपारिक दृष्टिकोनाचाही विचार करावा लागेल. आपण केवळ आपले उत्पादन, आपला ब्रँड, आपल्या विक्रीचा विचार इथपर्यंतच सीमित राहणे पुरेसे नाही. एक व्यवसाय म्हणून, आपल्याला दीर्घकालीन लाभ देणारी परिसंस्था निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करावे लागेल. आता जसे भारताने गेल्या काही वर्षात राबवलेल्या धोरणांमुळे केवळ 5 वर्षात 13.5 कोटीहून अधिक लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हे जे गरीबीतून वर आलेले लोक आहेत ते नव- मध्यमवर्गीय आहेत आणि मला वाटते की तेच सर्वात मोठे ग्राहक आहेत, कारण ते नवीन आकांक्षा घेऊन आले आहेत. नवमध्यमवर्गीय देखील भारताच्या विकासाला गती देत आहे. म्हणजेच सरकारने गरीबांसाठी जे काम केले आहे त्याचा अंतिम लाभार्थी आपला मध्यमवर्ग देखील आहे तसेच आपले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देखील आहेत. कल्पना करा, प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत गरीबांना थेट सहभागी करण्यावर लक्ष  केंद्रित केले तर पुढील 5-7 वर्षांत किती मोठा मध्यमवर्ग निर्माण होईल. म्हणूनच प्रत्येक व्यवसाय अधिकाधिक लोकांची क्रयशक्ती वाढवत आहे आणि मध्यमवर्गाची क्रयशक्ती जसजशी वाढते तसतसा त्याचा थेट व्यवसायावर मोठा परिणाम होतो. आणि आपल्याला दोन्हीवरही सम प्रमाणात लक्ष केंद्रित करायचे आहे.  जर आपण आत्मकेंद्रित राहिलो  तर मला नाही वाटत की आपण स्वतःचे तसेच जगाचे भले करू शकू. भूगर्भातील महत्वाची खनिजे आणि धातूंच्या बाबतीतही हे आव्हान आपण अनुभवत आहोत. या अशा गोष्टी आहेत ज्या काही ठिकाणी मुबलक प्रमाणात आहेत तर काही ठिकाणी अजिबातच नाहीत, मात्र संपूर्ण मानव जातीला त्याची गरज आहे. म्हणूनच हा साठा ज्यांच्याकडे आहे त्यांनी ही आपली जागतिक जबाबदारी म्हणून पाहायला हवे, नाहीतर वसाहतवादाच्या नव्या प्रारुपाला बळ मिळेल हा अतिशय गंभीर इशारा देत आहे.

मित्रहो,

उत्पादक आणि ग्राहक यांच्या हितसंबंधांमध्ये समतोल असेल तर फायदेशीर बाजारपेठ टिकून राहू शकते. हे राष्ट्रांनाही लागू होते. इतर देशांना केवळ बाजारपेठ मानूनच वाटचाल सुरू ठेवली तर ते कधीही चालणार नाही. यामुळे उत्पादक देशांचेही आज ना उद्या नुकसानच होईल. प्रगतीमध्ये प्रत्येकाला समान भागीदार बनवणे हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. इथे अनेक जागतिक व्यावसायिक नेते उपस्थित आहेत. सर्व व्यवसाय उद्योग अधिक ग्राहक-केंद्रित कसे बनवता येतील यावर आपण अधिक विचार करू शकतो का? हे ग्राहक व्यक्ती किंवा देश असू शकतात. त्यांच्या हिताचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एखाद्या वार्षिक मोहिमेचा आपण विचार करू शकतो का? दरवर्षी, जगभरातील उद्योजक एकत्र येऊन ग्राहकांच्या आणि त्यांच्या बाजारपेठेच्या हितासाठी वचनबद्धता व्यक्त करू शकतील का ?

मित्रहो,

जगभरातील सर्व उद्योजक मिळून वर्षातील एक दिवस ठरवू शकतील का जो ग्राहकांना समर्पित केला जाऊ शकतो? दुर्दैव बघा, आपण ग्राहक हक्कांबद्दल बोलतो, जगभरात ग्राहक हक्क दिन देखील साजरा करतो,  त्यांना ते करावे लागत आहे. ज्याप्रमाणे आपण कार्बन क्रेडिटकडून ग्रीन क्रेडिटकडे वाटचाल करायची आहे त्याप्रमाणे जागतिक ग्राहक हक्क दिनाची जगावर सक्ती करण्याऐवजी आपण ग्राहक सेवेचे नेतृत्व करून हे चक्र बदलू शकतो का. एकदा आपण ग्राहक सेवा दिन साजरा करायला सुरुवात केली, तुम्ही कल्पना करू शकता की वातावरण किती सकारात्मक होईल. मित्रांनो, जर ग्राहकांच्या सेवेचा विचार केला तर त्यांच्या हक्कांशी संबंधित समस्या आपोआप सुटतील. म्हणूनच आंतरराष्ट्रीय ग्राहक सेवा दिनाबाबत तुम्ही सर्वांनी मिळून काहीतरी विचार करावा असे मला वाटते. यामुळे व्यापार आणि ग्राहकांमधील परस्पर विश्वास अधिक बळकट होण्यास मदत मिळेल. आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ग्राहक म्हणजे केवळ ठराविक भौगोलिक परिघातील किरकोळ ग्राहक नाही तर विविध देश देखील आहेत जे जागतिक व्यापार, जागतिक वस्तू आणि सेवांचे ग्राहक आहेत.

मित्रहो,

आज जगातील मोठे उद्योगपती येथे एकत्र जमले असताना आपल्यासमोर इतरही काही मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवरील उत्तरेच व्यवसाय आणि मानवतेचे भवितव्य ठरवणार आहेत. आणि त्यावर उत्तर शोधण्यासाठी परस्परांमध्ये सहकार्य आवश्यक आहे. हवामान बदल असो, ऊर्जा क्षेत्रातील संकट असो, अन्न पुरवठा साखळीतील असंतुलन, असो, जल सुरक्षा, सायबर सुरक्षा असो, असे अनेक विषय आहेत ज्यांचा व्यवसायावर मोठा परिणाम होतो. याचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले सामायिक प्रयत्न वाढवावे लागतील. काळाच्या ओघात आपल्यासमोर अशा समस्या देखील उद्भवत आहेत, ज्याचा 10-15 वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल. आता जसे क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आव्हान आहे. या बाबत अधिकाधिक एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. मला वाटतं, यासाठी एक जागतिक आराखडा बनवला गेला पाहिजे, ज्यामध्ये सर्व हितधारकांचा विचार व्हायला हवा.

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही असाच दृष्टिकोन आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत आज जग खूप उत्साही दिसत आहे. मात्र उत्साहातही काही नैतिक विचार देखील मनात आहेत. कौशल्य आणि पुनर्कौशल्य, अनुचित पूर्वग्रह आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. आपण सर्वांनी मिळून अशा समस्या सोडवायला हव्यात. नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार सुनिश्चित करण्यासाठी जागतिक उद्योग समुदाय आणि सरकारांना एकत्र काम करावे लागेल.

विविध क्षेत्रातील संभाव्य अडथळ्यांबाबत सतर्क रहायला हवे. प्रत्येक वेळी समस्या दिसून येतात आणि आपण विचार करतो, अंदाज बांधतो त्यापेक्षा त्यांचे प्रमाण, त्याची व्याप्ती आणि त्याचे गांभीर्य अधिक कठीण होत आहे. ही समस्या जागतिक चौकटीत राहून सोडवावी लागेल. आणि मित्रांनो, अशी आव्हाने आपल्यासमोर काही पहिल्यांदाच आली आहेत असे नाही. जेव्हा विमान वाहतूक क्षेत्र विस्तारत होते, जेव्हा आर्थिक क्षेत्र विस्तारत होते तेव्हा देखील जगाने अशा चौकटी तयार केल्या आहेत. म्हणूनच आज मी B-20 ला या नवीन विषयांवरही चिंतन, विचारमंथन करण्याचे आवाहन करतो.

मित्रहो,

व्यापार सीमा ओलांडून यशस्वीपणे पुढे गेला आहे. मात्र आता व्यापार विशिष्ट स्तरापलीकडे नेण्याची ही वेळ आहे. यासाठी पुरवठा साखळ्यांमध्ये लवचिकता आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मला खात्री आहे की B20 शिखर परिषदेने सामूहिक परिवर्तनाचा मार्ग सुकर केला आहे. आपण हे लक्षात ठेवूया की परस्परांशी जोडलेले जग म्हणजे केवळ तंत्रज्ञानाद्वारे जोडणे राहणे नव्हे. हे केवळ सामायिक सामाजिक व्यासपीठांपुरते मर्यादित नाही तर सामायिक उद्देश, सामायिक ग्रह, सामायिक समृद्धी आणि सामायिक भविष्य हे देखील यात अंतर्भूत आहे.
धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

JPS/S.Tupe/Bhakti/Sushma/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952862) Visitor Counter : 249