राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींची गोवा भेट; गोवा येथील राजभवनात नागरी सत्कार सोहोळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 22 AUG 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

गोवा राज्य सरकारतर्फे आज, 22 ऑगस्ट 2023 रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ राज भवन येथे आयोजित नागरी सत्कार सोहोळ्याला उपस्थित राहून राष्ट्रपतींनी हा सत्कार स्वीकारला. याप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी लाभार्थ्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत ‘सनदेचे वितरण केले.

उपस्थितांना संबोधित करताना, राष्ट्रपती मुर्मू यांनी स्नेहपूर्ण स्वागताबद्दल गोव्याच्या जनतेचे आभार मानले. शाश्वत विकास ध्येयांच्या मानकांबाबत गोवा चांगली कामगिरी करत आहे याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये गोवा राज्याचा समावेश आहे.

गोव्याच्या नागरिकांमध्ये दिसून येणाऱ्या औदार्य आणि आदरातिथ्य या गुणांची राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की पश्चिम घाटांचे समुद्रकिनारे तसेच निसर्ग सौंदर्य यांच्याप्रमाणेच गोव्याच्या जनतेमध्ये असलेली ही वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.

समृध्द वन आच्छादन ही गोव्याकडे असलेली अमूल्य नैसर्गिक संपदा असून तिचे संवर्धन केले पाहिजे असे राष्ट्रपतींनी सांगितले. पश्चिमी घाटांच्या क्षेत्रातील घनदाट वने अनेक वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहेत आणि या नैसर्गिक वारशाचे जतन करण्यातून गोव्याच्या शाश्वत विकासाला अधिक वेग येईल असे त्या म्हणाल्या. आदिवासी तसेच जंगलात निवास करणाऱ्या इतर लोकांना विकासाचे भागीदार करून घेणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या परंपरांचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिक भर दिला.

त्या म्हणाल्या की पर्यटकांचे आवडते ठिकाण असण्यासोबतच गोवा हे शिक्षण, व्यापार आणि वाणिज्य,उद्योगतंत्रज्ञान आणि नौदल संरक्षण यांचे देखील महत्त्वाचे केंद्र आहे.

गोव्याच्या कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीमध्ये लिंग समानतेची परंपरा आहे असे निरीक्षण राष्ट्रपती मुर्मू यांनी नोंदवले. गोव्याच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विद्यार्थिनींचा 60 टक्क्याहून अधिक सहभाग आहे याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. गोव्याच्या कार्य संस्कृतीमध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण आणखी वाढवण्याची गरज आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

राष्ट्रपतींनी यावेळी क्रीडा, कला, लोकसेवा, अध्यात्मिकता आणि साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गोव्याच्या जनतेने दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. आधुनिकता आणि परंपरा यांच्यामध्ये योग्य तोल साधून गोवा राज्य पुढील वाटचाल करेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या समारंभात व्यक्त केला.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी इथे क्लिक करा -

  

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951236) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi