संरक्षण मंत्रालय

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या 'अस्मिता' या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सहभाग

Posted On: 21 AUG 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑगस्ट 2023

 

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (आवा),या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने नवी दिल्ली इथल्या माणेकशॉ सेंटर मध्ये 'अस्मिता- लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या प्रेरणादायक कहाण्या' या मालिकेतील दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक आव्हानांवर मात करत, चिकाटी आणि लवचिकतेच्या बळावर विविध क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या वीर पत्नींच्या प्रेरणादायी कथा सांगण्यासाठी या मंचाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ सुदेश धनखड आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या सन्माननीय अतिथी होत्या. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष अर्चना पांडे कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक होत्या.

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन ही संघटना भारतीय लष्करामधील कर्मचाऱ्यांच्या पत्नी, मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काम करते. भारतीय लष्कराच्या बळाला आकार देणारा  अदृश्य हात, अशी याची यथार्थ ओळख आहे. 23 ऑगस्ट 1966 रोजी या संघटनेची नवी दिल्ली प्रशासन, मंडळ निबंधकांकडे कल्याणकारी संस्था म्हणून अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली होती. आपल्या स्थापनेपासून आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनची व्याप्ती वाढली आहे. आज देशातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक  म्हणून ती ओळखली जाते.

अनेक संकटांवर मात करत ज्यांनी आपली ओळख मिळवली आहे, आणि आपल्यासारख्या इतरांना प्रेरणा दिली आहे, अशा धाडसी आणि कर्तृत्ववान वीर पत्नींसाठी ‘अस्मिता’ हे एक व्यासपीठ आहे. खडतर  आव्हानांवर मात करत, खंबीरपणे ताठ उभ्या राहिलेल्या शूर महिलांच्या संघर्षाला दिलेली ही सलामी आहे.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950875) Visitor Counter : 105