सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात, मेळा मोमेंट्स अंतर्गत सण आणि मेळावे प्रदर्शनाला सुरूवात
Posted On:
19 AUG 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात, मेळा मोमेंट्स अंतर्गत सुरु झालेल्या सण आणि मेळाव्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन राजेश गुप्ता (राष्ट्रपतींचे अतिरिक्त सचिव) आणि प्रा. व्ही नागदास, (ललित कला अकादमीचे अध्यक्ष ) यांच्या हस्ते झाले. हा उदघाटन समारंभ, राष्ट्रपती भवनचे संचालक मुकेश कुमार आणि ललित कला अकादमीचे उपसचिव रहास मोहंती तसेच सहभागी कलाकार आणि मोठ्या संख्येने आलेल्या कलाप्रेमींच्या उपस्थितीत झाला.
पुरस्कारप्राप्त छायाचित्रकारांनी टिपलेली 60 छायाचित्रे आणि ज्युरी सदस्यांनी टिपलेली 22 सर्वोत्तम छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पुरस्कार प्राप्त छायाचित्रांची निवड, या क्षेत्रातील निष्णात छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या ज्युरींच्या पॅनलने केली आहे. मेला मोमेंट्स छायाचित्र स्पर्धेअंतर्गत - मेला व्हायब्स, चाटोरी गल्ली, मेला पोर्ट्रेट आणि मेला स्टॉल्स या चार श्रेणींमध्ये देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी पाठवलेल्या 11000 प्रवेशिकांमधून ज्युरींनी 60 छायाचित्रे निवडली आहेत.
"छायाचित्र कला आणि सर्जनशील कलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही भविष्यात आणखी बरेच कार्यक्रम आयोजित करू,” असे ललित कला अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही नागदास यांनी मेळा मोमेंट्स प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाने मेळा मोमेंट्स छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती, तर ललित कला अकादमीने संपूर्ण देशभरासाठी नोडल संस्था म्हणून या स्पर्धेचे कामकाज पहिले. मासिक विजेत्यांना पुढीलप्रमाणे बक्षिसे मिळतील: पहिले पारितोषिक -10000/- रु दुसरे पारितोषिक - 7500/-रु तृतीय पारितोषिक - 5000/-रु, सहा महिन्यांच्या कालावधीतील मासिक विजेत्यांपैकी, महाअंतिम पारितोषिक लवकरच जाहीर केले जाईल ज्याअंतर्गत रु. 100000/- चे पहिले पारितोषिक, 75000/- रु. चे द्वितीय पारितोषिक आणि 50000/- रु. चे तृतीय पारितोषिक प्रदान केले जाईल.
सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली. अकादमीने लोकांना त्यांच्या जवळच्या पारंपारिक मेळ्यांना आणि उत्सवांना भेट देण्यासाठी आणि काळाच्या ओघात मागे पडलेल्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने दिलेल्या संकल्पनेनुसार सर्वोत्तम छायाचित्रे क्लिक करण्यासाठी प्रोत्साहित केले. अकादमीने या स्पर्धेविषयी आणि फोटोग्राफीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत भारतभर विविध फोटोटॉक, फोटो-वॉक, कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित केली. सहभागींनी त्यांची छायाचित्रे mygov.in आणि Google फॉर्म पोर्टलवर सादर केली.
हे प्रदर्शन 19 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत अमृत उद्यानातील फूड कोर्ट परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून कोणीही प्रवेश करू शकत असल्याने विशेष प्रवेश पासची आवश्यकता नाही.
***
M.Pange/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950528)
Visitor Counter : 154