वस्त्रोद्योग मंत्रालय

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन, ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे केले उद्घाटन


7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून जाहीर करण्याची पंतप्रधानांची घोषणा भारताच्या विकासाच्या प्रवासात विणकरांचे योगदान अधोरेखित करत आहे- पीयूष गोयल

पंतप्रधान जगभरात भारतीय हातमागांचे ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर आहेत- पीयूष गोयल

Posted On: 07 AUG 2023 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाला 3000 हून अधिक हातमाग आणि खादी विणकर, कारागीर तसेच वस्त्रोद्योग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधी उपस्थित आहेत. भारत मंडपमच्या भव्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतातील हातमाग उद्योगाचे योगदान अधोरेखित केले आणि ते म्हणाले की जुने आणि नवे यांचा संगम ही नव्या भारताची व्याख्या आहे. “ आजचा भारत केवळ ‘व्होकल फॉर लोकल’ नाही तर त्यांना जागतिक मंच देखील उपलब्ध करून देत आहे”, ते म्हणाले. आजचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विणकरांसोबत झालेल्या आपल्या संवादाची माहिती देताना, आजच्या भव्य सोहळ्यामध्ये देशभरातून विविध हातमाग समूहांच्या उपस्थितीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि त्यांचे स्वागत केले.

भारतामध्ये विविध प्रकारच्या पोशाखांचे एक अतिशय सुंदर इंद्रधनुष्य आहे, असे पंतप्रधानांनी भारताच्या दुर्गम भागातील आदिवासी समुदायांपासून हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये राहणारे लोक आणि किनारपट्टीच्या प्रदेशातील लोकांपासून ते वाळवंटी भागात राहणाऱ्या लोकांच्या पोशाखांबरोबरच भारतातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या पोशाखांच्या विविधतेला अधोरेखित करताना सांगितले. भारतामधील पोशाख विषयक विविधता सूचीबद्ध करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली होती याची आठवण करून दिली आणि ही सूचना आज ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’ च्या उद्घाटनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी राबविण्यात आलेल्या योजना सामाजिक न्यायाचे प्रमुख माध्यम बनत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले कारण देशभरातील खेडे आणि शहरांमध्ये लाखो लोक हातमाग कामात गुंतलेले आहेत. यातील बहुतांश लोक दलित, मागास, पसमांडा आणि आदिवासी समाजातून आलेले आहेत हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारही वाढला आहे. वीज, पाणी, गॅस कनेक्शन, स्वच्छ भारत या योजनांची उदाहरणे देत त्यांनी अशा मोहिमांचा सर्वाधिक लाभ झाल्याचे सांगितले. “मोफत रेशन, पक्के घर, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, ही मोदींची हमी आहे”, असे पंतप्रधानांनी हे अधोरेखित करत सांगितले की, विद्यमान सरकारने विणकर समाजाची मूलभूत सुविधांसाठी असलेली अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली आहे. 

प्रत्येक जिल्ह्यातील विशेष उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे असे पंतप्रधानांनी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेबद्दल बोलताना सांगितले. "अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी देशातील रेल्वे स्थानकांवर विशेष स्टॉल देखील उभारले जात आहेत", असे ते म्हणाले. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यातील हातमागांवर  बनवलेले प्रकार  आणि  हस्तकला उत्पादनांना एकाच छताखाली प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून राज्यांच्या प्रत्येक राजधानीत विकसित करण्यात येत असलेल्या आगामी एकता मॉलचाही त्यांनी उल्लेख केला. हातमाग क्षेत्राशी निगडित लोकांना या एकता मॉलचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील एकता मॉलचाही उल्लेख केला. या मॉलमुळे पर्यटकांना भारताची एकता अनुभवण्याची आणि एकाच छताखाली कोणत्याही राज्यातील उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.

जीईएम पोर्टल किंवा सरकारी ई-मार्केटप्लेस बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की अगदी लहान मोठे कारागीर किंवा विणकर देखील त्यांचा माल थेट सरकारला विकू शकतात. हातमाग आणि हस्तकलेशी संबंधित सुमारे 1.75 लाख संस्था आज जेईएम पोर्टलबरोबर जोडल्या गेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. “हातमाग क्षेत्रातील आपल्या बंधू-भगिनींना डिजिटल इंडियाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात भारत मंडपममध्ये आयोजित केलेल्या 9व्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. या सोहळ्यामध्ये पंतप्रधानांनी आपले विचार व्यक्त करताना, वस्त्रोद्योग क्षेत्राचा समृद्ध प्राचीन वारसा, हातमाग क्षेत्राचे योगदान, विणकर आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि त्यामुळे हातमाग उत्पादने विशेषतः खादी उत्पादनांची वाढलेली लोकप्रियता आणि विक्रीत झालेली अभूतपूर्व वाढ यांची माहिती दिली.  

त्यापूर्वी राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्याच्या स्वागतपर भाषणात केंद्रीय वस्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व लक्षात घेणाऱ्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी बोलताना गोयल म्हणाले की पंतप्रधान जगभरात भारतीय हातमागांचे सदिच्छा दूत आहेत कारण ते जागतिक नेत्यांना बहुतेक वेळी भारतीय हातमागावरील उत्पादनांच्या भेटवस्तू  देत असतात. यामुळे केवळ विणकरांनाच मान्यता मिळत नसून जगभरात भारताच्या संस्कृतीचा प्रसार होण्यासही मदत मिळत आहे, असे गोयल यांनी सांगितले.

हातमाग क्षेत्राने भारताला सुवर्णयुग प्राप्त करून दिले होते याची आठवण केंद्रीय मंत्र्यांनी करून दिली. #MyHandloomMyPride हे केवळ एक घोषवाक्य नसून भारतीय विणकरांचे उत्पन्न वाढवणारी, त्यांची प्रतिष्ठा वाढवणारी आणि त्यांना सक्षम करणारी एक चळवळ आहे, असे त्यांनी नमूद केले. खादी हे भारतीय स्वातंत्र्य  चळवळीचे प्रतीक बनले होते आणि आजही भारताला विकसित आणि स्वयंपूर्ण देश बनवण्याच्या उद्दिष्टामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले.

विणकर हे केवळ कारागीरच नाहीत तर ते जादूगार आहेत जे ज्ञान, कौशल्य आणि कलेचा अनेक शतकांचा प्राचीन वारसा पुढे नेत आहेत, असे गोयल म्हणाले.

देशभरातील 3000 पेक्षा जास्त हातमाग आणि खादी विणकर, कारागीर आणि वस्त्रोद्योग आणि एमएसएमई क्षेत्रातील हितधारक या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच देशभरातील विणकरांच्या 75 समूहांमध्ये 7500 पेक्षा जास्त विणकरांनी दूरदर्शनवर हा कार्यक्रम पाहिला. राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्याचा भाग म्हणून आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

* * *

N.Chitale/PM Release+S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946504) Visitor Counter : 184