जलशक्ती मंत्रालय
आग्रा इथे झालेल्या परिणाम मूल्यांकन बैठकीत एनएमसीजी च्या महासंचालकांचे जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमोर नमामी गंगे प्रकल्पाचे सादरीकरण
Posted On:
06 AUG 2023 3:21PM by PIB Mumbai
देशात बँकेच्या प्रकल्पाच्या परिवर्तनकारक प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी, जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांनी पाच ऑगस्ट 2023 रोजी, उत्तरप्रदेशात आग्रा इथे बैठक घेतली. यावेळी एनएमसीजी म्हणजेच, स्वच्छ गंगेसाठीच्या राष्ट्रीय अभियानाचे महासंचालक जी. अशोक कुमार यांनी जगभरातील जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमोर नमामि गंगा प्रकल्पाविषयी तपशीलवार सादरीकरण केले. यावेळी जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे कौमे ही उपस्थित होते.
या बैठकीत, नदी पुनरुज्जीवनाचे विविध पैलू आणि त्यात जागतिक बँकेची भूमिका, या विषयावर जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसोबत सविस्तर चर्चा झाली. जल-सुरक्षित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रयत्नात, विशेषत: नमामि गंगे अभियाना अंतर्गत, करण्यात आलेल्या परिवर्तनात्मक सुधारणा आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाने करण्यात आलेल्या जल क्षेत्रातील विकासाचे या संचालकांनी कौतुक केले. सर्वसामान्य नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि समग्र समाज यासह अनेक भागधारकांनी या अभियानात एकत्र येऊन, लोकचळवळीचा नवा अध्याय सुरू केला आहे याचे कौतुक करत, आज नमामि गंगे अभियान जागतिक स्तरावर नदी पुनरुज्जीवनाची ओळख बनले आहे, असे ते म्हणाले.
नमामि गंगे कार्यक्रमाविषयी मान्यवरांना तपशीलवार सादरीकरण करतांना जी. अशोक कुमार यांनी सांगितले, की, भारताच्या आर्थिक विकासासाठी पाण्याला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ओळखले गेले आहे आणि म्हणूनच गेल्या 7-8 वर्षात, जलक्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच, ‘कॅच द रेन’ बद्दल देखील महासंचालकांनी मान्यवरांना माहिती दिली.
नमामि गंगे कार्यक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की हे एक सर्वांगीण आणि एकात्मिक नदी पुनरुज्जीवन अभियान असून यात केवळ गंगा नदी स्वच्छ करण्याचा नाही तर लोकसहभागातून नदीची संपूर्ण परिसंस्था पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946242)
Visitor Counter : 116