सांस्कृतिक मंत्रालय
ग्रंथालये ही देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ज्ञानाचे शक्तीकेंद्र म्हणून भारताच्या प्रवासाचे दर्शन घडवणा-या ग्रंथालय महोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
05 AUG 2023 5:25PM by PIB Mumbai
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे अनोख्या ‘ग्रंथालयांच्या महोत्सवा’चे उद्घाटन केले. ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि वाचन संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ग्रंथालयांच्या विकासाचा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी संबंध आहे. ग्रंथालये सभ्यतेच्या प्रगतीचेही एक मापदंड आहे. त्या म्हणाल्या की, आक्रमणकर्त्यांनाही ग्रंथालये नष्ट करणे आवश्यक वाटत होते, अशी अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आहेत. यावरून असे दिसून येते की, ग्रंथालये एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत. आधुनिक युगात अशा घटना घडत नसून दुर्मिळ हस्तलिखिते आणि पुस्तके गायब होण्याच्या घटना घडत आहेत, याकडे राष्ट्रपती मुर्मू यांनी लक्ष वेधले. दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखिते परत आणण्यासाठी प्रयत्न करता येतील, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, ग्रंथालये म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सेतूचे काम करतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक देशांतील लोकांनी भारतातून पुस्तके नेली आणि त्यांची भाषांतरे करून ज्ञान मिळवले. पुस्तके आणि ग्रंथालये हा मानवतेचा समान वारसा आहे, हा विचार अशा प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, एका छोट्या पुस्तकात जगाच्या इतिहासाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. गांधीजींच्या आत्मचरित्राचा संदर्भ देवून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले, त्यांच्या जीवनावर जॉन रस्किन यांच्या 'अनटू दिस लास्ट' या पुस्तकाने मोठा सकारात्मक प्रभाव टाकला. त्या म्हणाल्या की, पुस्तकांमध्ये भूमीचा सुगंध आणि आकाशाची भव्यता असते.
सांस्कृती आणि कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सांस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, मीनाक्षी लेखी आणि संस्कृती सचिव गोविंद मोहन हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेघवाल म्हणाले की, ग्रंथालय महोत्सव म्हणजे, 21 व्या शतकात भारताला जगातील ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महासत्ता बनवण्याच्या ध्येयाकडे जाण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.
मंत्री मीनाक्षी लेखी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल सांगितले. तसेच वाचनालयाच्या विकासासाठी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले.
सर्वसमावेशकता वाढवणे आणि सर्व नागरिकांसाठी माहितीचा प्रवेश सुनिश्चित करणे यासाठी, 'फेस्टिव्हल ऑफ लायब्ररी 2023' ही मोहीम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. वैविध्यपूर्ण ज्ञानाचा प्रसार करून आणि वाचनाच्या सवयींना प्रोत्साहन देऊन, हा ग्रंथालय उत्सव अधिक माहितीपूर्ण आणि सशक्त समाजाच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त करणारा आहे. यामुळे देशभरात शिकण्याची आणि प्रेरणादायी प्रगतीची तहान शमवणारा हा महोत्सव आहे, ” असेही मीनाक्षी लेखी पुढे म्हणाल्या.
***
R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946108)
Visitor Counter : 137