उपराष्ट्रपती कार्यालय
लोकशाहीची मंदिरे अप्रत्यक्षपणे उद्ध्वस्त केली जात आहेत – उपराष्ट्रपती
चर्चा, संवाद आणि वादविवादाचे व्यासपीठ म्हणून जोपासली नाहीत तर, लोकशाहीची मंदिरे ही, प्रतिनिधी अथवा उत्तरदायी नसलेल्या शक्तींनी व्यापली जातील- उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
संविधानाने बंधनकारक केलेले कार्य सर्व लोकप्रतिनिधी निष्ठेने करतील हे सुनिश्चित करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर सुनिश्चित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, यावर उपराष्ट्रपतींचा भर
संवैधानिक संस्थांना कलंकित, मलिन आणि अपमानित करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला, अविचारी आणि अतार्किकपणे परवानगी दिली जाऊ नये - उपराष्ट्रपती
"गांभीर्याने विचार करा, विस्तृत वाचन करा, सातत्य ठेवा आणि आपले क्षितीज व्यापक करा असा उपराष्ट्रपतींचा विद्यार्थ्यांना सल्ला"
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज नागपुरात उपराष्ट्रपतींचे संबोधन
Posted On:
04 AUG 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2023
संविधानाने बंधनकारक केलेले कार्य सर्व लोकप्रतिनिधी निष्ठेने करतील हे सुनिश्चित करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन उपराष्ट्रपती, जगदीप धनखड यांनी आज नागरिकांना केले.
“लोकशाहीची मंदिरे अप्रत्यक्षपणे उद्ध्वस्त होत आहेत” अशी चिंता व्यक्त करून, उपराष्ट्रपतींनी नागरिकांना सावध केले की, जर ही स्थाने चर्चा, संवाद आणि वादविवादाचे व्यासपीठ म्हणून जोपासली नाहीत, तर ती प्रतिनिधी नसलेल्या किंवा राष्ट्राप्रती उत्तरदायित्व नसलेल्या शक्तींनी व्यापले जाण्याची शक्यता आहे.
उपराष्ट्रपतींनी संविधान सभेचे उदाहरण दिले. संवाद आणि चर्चेद्वारे मतभेदाचे रुपांतर निषेधात होऊ न देण्यावर उपराष्ट्रपतींनी जोर दिला. "संविधान सभेला दुही आणि वादग्रस्त समस्यांचा सामना करावा लागला, परंतु त्या नेहमी समन्वय, सहकार्य आणि सहयोगाच्या भावनेने सोडवल्या गेल्या," असे ते म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला आज नागपुरमध्ये संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी आर्थिक राष्ट्रवादाबाबत विचार व्यक्त केले. “व्यापार, उद्योग आणि व्यवसाय या बाबतीत अत्यंत संवेदनशील असले पाहिजेत. आर्थिक राष्ट्रवादाचे महत्त्व नागरिकांनी स्वतः जाणले तरच हे साध्य होऊ शकते,” असे त्यांनी आवाहन केले.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेपर्वा वापराला परवानगी देता येणार नाही यावर जोर देऊन उपराष्ट्रपतींनी नागरिकांना आठवण करून दिली की त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार ऊर्जा किंवा जलस्रोत वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. "या संसाधनांचा इष्टतम वापर सुनिश्चित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे," हे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावर भारताने मिळवलेला मान, प्रतिष्ठा आणि स्थान यावर प्रकाश टाकत उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, "कोणत्याही व्यक्तीला, "अनावश्यकपणे आणि अतार्किकपणे, संवैधानिक संस्थांना कलंकित, मलीन आणि अपमानित करण्याची परवानगी दिली जाऊ नये." त्यांनी नागरिकांना राष्ट्रहिताच्या विरोधी अशा गोष्टींना निष्प्रभ करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मोकळे मन ठेवण्याचे महत्त्व पटवून देताना, उपराष्ट्रपतींनी आवाहन केले कि "प्रतिक्रिया सावकाश द्या पण समजून लवकर घ्या.'' "जेव्हा तुम्ही इतरांच्या भूमिकेचे कौतुक करायला शिकाल तेव्हा तुम्ही शहाणे व्हाल," त्यांनी सांगितले. ‘वॉरियर्स ऑफ 2047’ ला त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी प्रोत्साहित करत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या मार्गांमध्ये "गांभीर्याने विचार करा, विस्तृत वाचन करा, सातत्य ठेवा आणि क्षितीज व्यापक करा” असा सल्ला दिला.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945942)
Visitor Counter : 116