पंतप्रधान कार्यालय

हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारत-फ्रान्स आराख़डा

Posted On: 14 JUL 2023 11:10PM by PIB Mumbai

भारत आणि फ्रान्स हे हिंद-प्रशांत क्षेत्रात सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानावर स्थित असलेल्या या भागावर प्रभाव असलेल्या सत्ता आहेत आणि या क्षेत्रात महत्त्वाचे हितसंबंध असलेले प्रमुख भागीदार आहेत.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मित्र आहेत. हिंदी महासागरातील भारत-फ्रान्स भागीदारीवर आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रमुख भर आहे. 2018 मध्ये, भारत आणि फ्रान्सने 'हिंदी महासागर क्षेत्रात भारत-फ्रेंच सहकार्यासाठी संयुक्त सामरिक दृष्टीकोनाबाबत' सहमती दर्शवली. आता आमचे संयुक्त प्रयत्न प्रशांत महासागरापर्यंत विस्तारित करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

हिंद-प्रशांत क्षेत्र एक मुक्त, खुले, समावेशक, सुरक्षित आणि शांततामय क्षेत्र असावे ही आम्हा दोन्ही देशांची धारणा आहे. जागतिक सामाईक संसाधनांवर समान आणि मुक्त अधिकार सुनिश्चित करून आपल्या स्वतःच्या आर्थिक आणि सुरक्षाविषयक हितसंबंधांचे रक्षण करणे, या भागात समृद्धी आणि शाश्वततेच्या भागीदारींची उभारणी करणे, आंतरराष्ट्रीय नियमांचा पुरस्कार करणे आणि या भागातील आणि त्या पलीकडील इतरांसोबत काम करणे आणि या भागातील सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करून एक संतुलित आणि स्थिर व्यवस्था निर्माण करणे हा आमच्या भागीदारीचा उद्देश आहे.

पंतप्रधान मोदी यांचा सागर (Security and Growth for All in the Region) हा दृष्टीकोन आणि अध्यक्ष मॅक्राँ यांचा फ्रान्सच्या हिंद-प्रशांत धोरणामध्ये आरेखित करण्यात आलेला सुरक्षा आणि सहकार्याचा दृष्टीकोन हे बऱ्याच अंशी परस्परांशी संलग्न आहेत. आमचे सहकार्य सर्वसमावेशक आहे आणि  संरक्षण, आर्थिक, दळणवळण, पायाभूत सुविधा, शाश्वतता आणि मानवकेंद्री विकास या क्षेत्रांना सामावणारे आहे.

आमचे द्विपक्षीय सहकार्य परस्परांच्या सुरक्षेला चालना देते आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला पाठबळ देते. सागरतळापासून अंतराळापर्यंत आमचे सहकार्य विस्तारलेले आहे. आमच्यातील देवाणघेवाण अधिक जास्त प्रमाणात करणे आम्ही सुरू ठेवणार आहोत,  परिस्थितीजन्य आणि क्षेत्रीय जागरुकतेबाबत सहकार्य करत राहणार आहोत, नैऋत्य हिंदी महासागर क्षेत्रात भागीदार देशांसोबत असलेल्या सहकार्याप्रमाणेच या प्रदेशातील सागरी सहकार्यात अधिक जास्त वाढ करू. आम्ही आमच्या सैन्याच्या नौदल भेटींमध्ये देखील वाढ करणार आहोत आणि भारतातील संरक्षण उद्योगांच्या क्षमतांचा विकास करणार आहोत आणि आमच्या देशांच्या गरजांना संयुक्तपणे पाठबळ देणार आहोत. ला रियुनियन, न्यू कॅलेडोनिया आणि फ्रेंच पॉलिनेशिया या फ्रान्सच्या मालकीच्या परदेशी प्रदेशांसह आणि या प्रदेशातील आणि त्या पलीकडील देशांसोबत आमचे सर्वसमावेशक सहकार्य विकसित करणे सुरू ठेवणार आहोत.

आफ्रिका,हिंदी महासागर क्षेत्र, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि प्रशांत क्षेत्रासह या प्रदेशातील देशांसोबत विकासविषयक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे सुरू ठेवणार आहोत. ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या आमच्या बहुपक्षीय व्यवस्था आम्ही बळकट करणार आहोत आणि या प्रदेशात नव्यांची उभारणी करणार आहोत.

आम्ही ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’, ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोसियम’, ‘इंडियन ओशन नेव्हल कमिशन’, जिबूती आचारसंहिता, ADMM+ आणि ARF यांसारख्या प्रादेशिक मंचांवर सहकार्य मजबूत करू.

आम्ही भारतातील ‘IFC-IOR’, संयुक्त अरब अमिरात आणि अटलांटामधील ‘EMASoH’, सेशेल्समधील ‘RCOC’ मादागास्करमधील ‘RMIFC’ आणि सिंगापूरमधील ‘ReCAAP’ यांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा बळकट करणार आहोत. संयुक्त सागरी सुरक्षा दलांमध्ये (CMF) सहभागी होण्याच्या भारताच्या इच्छेला फ्रान्सचा देखील पाठिंबा आहे.
हिंद प्रशांत क्षेत्रातील सामाईक आव्हानांना त्याच्या सात स्तंभांतर्गत सहकार्यकारी कृतींच्या माध्यमातून तोंड देण्याचा उद्देश असलेल्या हिंद-प्रशांत उपक्रमाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. सागरी संसाधन स्तंभावरील फ्रान्सच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध द्विपक्षीय, प्रादेशिक आणि दोन्ही बाजूंच्या जागतिक उपक्रमांशी ताळमेळ साधून आणि त्या अंतर्गत शाश्वत सागरी संसाधन विकासाकरिता एक परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि आययूयू मासेमारीसारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी एकत्र काम करणार आहोत.

भारत आणि फ्रान्सने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा प्रारंभ केला आणि या प्रदेशात अक्षय ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. ‘सोलर एक्स चॅलेंज प्रोजेक्ट’ पासून या प्रदेशातील स्टार्टअप्सना लाभ मिळेल, असे देखील ते प्रस्तावित करत आहेत. भारत आणि फ्रान्सने ‘इंडो पॅसिफिक पार्क’ भागीदारीची अंमबजावणी सुरू ठेवली आहे आणि विशेषत्वाने प्रशांत क्षेत्रातील देशांना डोळ्यासमोर ठेवून खारफुटी संवर्धनाला पाठबळ देत आहेत.

हिंद प्रशांत त्रिकोणी विकास सहकार्य निधी योजना अंतिम करण्यावर दोन्ही बाजू काम करतील. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीमधील आमची भागीदारी या प्रदेशातील विशेषतः लहान द्वीपराष्ट्रांमधील लोकांसाठी अधिक जास्त प्रतिरोधक आणि शाश्वत भविष्याची उभारणी करण्यासाठी मदत करेल. याशिवाय फ्रान्स भारताला ‘KIWA’ या प्रशांत क्षेत्रात ठोस प्रकल्पांसाठी सुलभीकरण केलेल्या आर्थिक पाठबळाच्या माध्यमातून हवामान बदल प्रतिरोध आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तयार केलेल्या बहु-दाता कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देत आहे.

भारत आणि फ्रान्स इंडो-फ्रेंच आरोग्य संकुलाची संशोधन आणि शिक्षण समुदायाला आकर्षित करणारे एक प्रादेशिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने उभारणी करण्यासाठी एकत्रित काम करतील. हिंदी महासागरातील अनुभवाच्या आधारे आम्ही प्रशांत महासागरातील द्वीपराष्ट्रांना हे संकुल खुले करण्याचा विचार करू शकतो.

आम्हाला असे वाटते की भारत-फ्रान्स भागीदारी ही हिंद प्रशांत क्षेत्रातील परस्परांशी जोडलेल्या आणि परस्परांना छेदणाऱ्या व्यवस्थांचा एक अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या शांततामय आणि समृद्ध भवितव्यासाठी अपरिहार्य आहे.

****

Sonal T/Shailesh P/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1945696) Visitor Counter : 93