निती आयोग
नीती आयोगातर्फे जागतिक अर्थव्यवस्थेसाठीच्या हरित आणि शाश्वत विकास कार्यक्रमावर आधारित जी-20 परिषदेचे आयोजन
उच्च गुणवत्तेच्या शाश्वत विकासाला पाठींबा देण्याबाबत एकमत मिळवण्याची संधी : नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी
नवी दिल्ली येथे 28 आणि 29 जुलै 2023 या दिवशी ही दोन दिवसीय परिषद होणार
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
नीती आयोग, या भारत सरकारच्या धोरण नियोजन विषयक संस्थेने, ओटावा येथील आंतरराष्ट्रीय विकास संशोधन केंद्र आणि नवी दिल्ली येथील जागतिक विकास नेटवर्क (जीडीएन) यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय धोरणविषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जागतिक पातळीवरील हरित आणि शाश्वत विकासविषयक शक्यता आणि आव्हाने यांचे परीक्षण करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे 40 अग्रणी विचारवंत सहभागी होणार आहेत.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी म्हणाले, “उच्च गुणवत्तेच्या शाश्वत विकासाला पाठींबा देण्याबाबत राजकीय एकमत तयार करण्याची क्षमता जी-20 समूहाला त्याच्या कायदेशीर स्वरूपामुळे मिळालेली आहे.” जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी असे सुचवले आहे की, येत्या दशकात अनेक घडामोडींसाठी विविध विकास धोरणांची आवश्यकता असेल. भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली अनुषंगिक कार्यक्रम म्हणून या कार्यशाळेचा समावेश करण्यात आला आहे, याचा या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आम्हाला अभिमान वाटतो असे ते म्हणाले. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला होणार असलेल्या प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेपूर्वी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी, उर्जा, हवामान आणि विकास, तंत्रज्ञान, धोरणे आणि नोकऱ्या आणि शाश्वत विकासासाठी जागतिक वित्तपुरवठ्याला नव्याने आकार देणे या संकल्पनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बहुपक्षीयता,तसेच अनिश्चित जगातील तडजोडी,लवचिकता आणि समावेशन यांच्याशी संबंधित संकल्पनांवर चर्चा करण्यात येईल. नीती आयोग आणि त्यांचे भागीदार या कार्यशाळेतून हाती आलेल्या निष्कर्षांचा विविध मंचाच्या माध्यमातून पाठपुरावा करतील.
सदर धोरणविषयक कार्यशाळेच्या सुरवातीला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्यम् उपस्थितांना संबोधित करतील, तर जी-20 साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी या कार्यशाळेची उद्दिष्ट्ये आणि प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देतील.
For details : https://niti.gov.in/g-20-conference
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1943405)
आगंतुक पटल : 177