आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
अंगदान महोत्सव आणि जुलै या अवयव दान महिन्या दरम्यान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या वतीने राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने आयोजित केले राष्ट्रीय वेबिनार
वेबिनारचा एक भाग म्हणून मूत्रपिंड रोग प्रतिबंध, यकृत रोग प्रतिबंध, अवयव आणि नेत्रदान, ऊती दानाच्या कायदेशीर बाबी यासह इतर बाबींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सहा सत्रांचेही आयोजन
Posted On:
23 JUL 2023 11:41AM by PIB Mumbai
राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना (NOTTO) यांनी भारत सरकारच्याआरोग्य सेवा महासंचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, अंगदान महोत्सव मोहिमेदरम्यान अवयव आणि ऊती दान या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करून अवयव आणि ऊतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आपली अखंड वचनबद्धता दाखवून दिली आहे. 22 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारला देशभरातील सहभागींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या वेबिनारने जुलै या अवयव दान महिन्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोएल यांच्या अध्यक्षतेखाली झालेला हा कार्यक्रम वैद्यकीय व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर संबंधितांसाठी अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील मान्यवर तज्ञांकडून मौल्यवान माहिती आणि ज्ञान घेण्यासाठी एक ज्ञानवर्धक व्यासपीठ ठरला.
वेबिनारमध्ये सहा आकर्षक सत्रे होती. यात अवयव आणि ऊतींचे दान, उपस्थितांमध्ये जागरुकता आणि याबाबतची समज वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता. या सत्रांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांपासून बचाव, ब्रेन स्टेम मृत घोषणा, यकृत रोगांचा प्रतिबंध, अवयव आणि ऊती दान, नेत्रदानाच्या कायदेशीर बाबी तसेच नेत्रपटल प्रत्यारोपण यावर लक्ष केंद्रित केले गेले.
एम्समधील प्राध्यापक आणि किडनी विषयक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय अग्रवाल, फोर्टिस रुग्णालयाच्या मेंदूविषयक शस्त्रक्रिया विभागाचे कार्यकारी संचालक डॉ संदीप वैश्य, इत्यादी मान्यवर या सत्रांमध्ये सहभागी झाले होते. अवयव आणि ऊती दानावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये वैद्यकीय आणि निम्नवैद्यकीय व्यावसायिक, विद्यार्थी आणि देशभरातील विविध प्रादेशिक आणि राज्य अवयव आणि ऊती दान रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमधील संबंधितांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
संकलित वेबिनार आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत YouTube वाहिनीवर पाहण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://youtube.com/live/OB7l14IM5ts?feature=share
***
N.Chitale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941895)
Visitor Counter : 152