मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास – W20 जनभागीदारीविषयक कार्यक्रम

Posted On: 22 JUL 2023 2:19PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, गुजरातमधील आणंद येथे आज दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील शाश्वत विकास या W20 जनभागीदारीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुग्धविकास क्षेत्रातील तज्ञ आणि महिला नेतृत्वासह सन्माननीय अतिथी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. दुग्धविकास क्षेत्रात महिलांचे महत्त्व आणि त्यांची भूमिका यावर अधिक भर देत त्यांनी मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महिलांच्या योगदानाकडे निर्देश केला तसेच सध्या कार्यरत असलेल्या दूध सहकारी संस्थांपैकी 18 संस्था संपूर्णपणे महिलांद्वारा संचालित आहेत, या बाबीचा त्यांनी ठळक उल्लेख केला.

पशुपालन विभाग सचिव अलका उपाध्याय यांनी यावेळी, श्वेतक्रांतीमध्ये महिलांच्या लक्षणीय योगदानावर भर देऊन सांगितले की सध्या दुग्धविकास क्षेत्रामधील एकूण कार्यबळात 70 टक्के महिलांचा समावेश आहे.

त्यांनी ए-हेल्प (पशुधनाचे आरोग्य तसेच विस्तार यासाठी नेमलेले मान्यताप्राप्त एजंट) या नव्या उपक्रमाचा देखील उल्लेख केला. या उपक्रमामध्ये समुदायाधारित महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने प्राथमिक सेवा पुरवतानाच, स्थानिक पशुवैद्यकीय सेवा प्रदाते आणि पशुधनाचे मालक यांच्यातील दरी सांधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अलका उपाध्याय यांनी यावेळी वन हेल्थ संकल्पनेचे तसेच पशूंच्या आजारांना प्रतिबंध करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

गुजरात राज्य सरकारमधील सहकार राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जनभागीदारी: दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील शाश्वत विकासया कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जनभागीदारी: दूध सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील शाश्वत विकासया कार्यक्रमामध्ये देशाच्या विविध राज्यांतून दुग्धविकास क्षेत्रात कार्यरत महिला शेतकऱ्यांनी भाग घेतला. या महिलांनी महिला उद्योजकता, मुलभूत पातळीवरील महिला नेतृत्व, लिंगाधारित डिजिटल विषमता दूर करणे, शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच हवामानाधारित कृती या W20 च्या पाच महत्त्वाच्या प्राधान्यक्रम क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय यशोगाथा सामायिक केल्या.

या एकदिवसीय कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये महिला नेतृत्वाच्या लवचिकतेचा प्रवास आणि आंतरशाखीय सहयोगाच्या माध्यमातून शाश्वत विकासात महिलांचे योगदान या विषयांवर गटचर्चा पार पडल्या. या चर्चांमध्ये राहीबाई सोमा पोपेरे (भारताच्या बीजमाता), टेसी थॉमस (एरोनॉटीकल यंत्रणेच्या माजी महासंचालक आणि डीआरडीओ च्या अग्नी-4 क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या प्रकल्प संचालक), लज्जा गोस्वामी (आंतरराष्ट्रीय नेमबाज, राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती) आणि डॉ. संध्या पुरेचा (सुप्रसिध्द नृत्यगुरु) यांनी सहभागी होऊन आपल्या प्रेरणात्मक वाटचालीविषयी माहिती दिली.

कार्यक्रमात सहभागी महिला प्रतिनिधींचा उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. संध्या पुरेचा यांच्या हस्ते सन्मान केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

***

M.Pange/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941724) Visitor Counter : 145