पंतप्रधान कार्यालय

जी 20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित


“व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत सर्व स्तरावरील विकासावर ऊर्जेचा परिणाम होतो”

“भारताने आपले गैर -जीवाश्म स्थापित विद्युत क्षमतेचे उद्दिष्ट नऊ वर्षे आधीच  गाठले आहे”

“सर्वांसाठी सर्वसमावेशक, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत ऊर्जेसाठी कार्य करण्याचा आमचा  प्रयत्न आहे”

"आंतर-संलग्न हरित ग्रीड्सच्या दृष्टीकोनाची पूर्तता केल्याने , आपल्या सर्वांना हवामानसंबंधी  उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी , हरित गुंतवणुकीला चालना देण्यासाठी  आणि लाखो हरित  रोजगार निर्मितीसाठी मदत  होईल"

"आपले विचार आणि कृती नेहमीच आपल्या 'एका  पृथ्वी' चे संवर्धन करण्यासाठी, आपल्या 'एका कुटुंबाच्या' हिताचे रक्षण करण्यासाठी आणि  हरित अशा 'एका भविष्या' कडे वाटचाल करण्यासाठी सहाय्यकारी ठरली पाहिजे"

Posted On: 22 JUL 2023 9:48AM by PIB Mumbai


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात आयोजित जी 20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीला चित्रफीत  संदेशाद्वारे संबोधित केले.

उपस्थित मान्यवरांचे भारतात स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत सर्व स्तरावरील विकासावर ऊर्जेचा परिणाम होतो त्यामुळे भविष्यशाश्वतता, वृद्धी  आणि विकास याविषयी कोणतीही चर्चा उर्जेचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे .

जरी प्रत्येक राष्ट्राची प्रत्यक्ष स्थिती आणि ऊर्जा संक्रमणाचा मार्ग भिन्न  असला तरीही, प्रत्येक देशाची उद्दिष्टे समान आहेत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत हे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तरीही ते आपल्या हवामान संबंधित  वचनबद्धतेच्या दिशेने ताकदीने  वाटचाल करत आहे, याकडे पंतप्रधानांनी हरित विकास  आणि ऊर्जा संक्रमणातील भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत लक्ष वेधले. भारताने आपले गैर-जीवाश्म स्थापित विद्युत क्षमतेचे उद्दिष्ट नऊ वर्षे अगोदरच  गाठले आहे आणि स्वतःसाठी उच्च उद्दिष्ट  निर्धारित  केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी  दिली. 2030 पर्यंत 50 टक्के  गैर-जीवाश्म  स्थापित क्षमता गाठण्याची राष्ट्राची योजना आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. सौर आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत  भारत देखील जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या आघाडीच्या  राष्ट्रांमध्ये  आहे,असे सांगत  कार्यगटाच्या प्रतिनिधींना पावागड  सौर  पार्क आणि मोढेरा सौरग्रामला  भेट देऊन स्वच्छ ऊर्जेसाठी भारताच्या वचनबद्धतेची उंची  आणि व्याप्ती  पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

भारताने 190 दशलक्षहून अधिक कुटुंबांना एलपीजीशी  जोडले आहे, तसेच प्रत्येक गावाला विजेने जोडण्याचा ऐतिहासिक टप्पाही नोंदवला आहे, असे पंतप्रधानांनी गेल्या 9 वर्षातील देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना सांगितले. काही वर्षांत 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला उपलब्ध होण्याची  क्षमता असलेल्या पाईपद्वारे गॅस द्वारे स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून देण्याच्या कामालाही त्यांनी स्पर्श केला. "सर्वांसाठी सर्वसमावेशक, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत उर्जेसाठी कार्य  करण्याचा आमचा प्रयत्न आहे",असे ते म्हणाले.

2015 मध्ये, भारताने एलईडी  दिवे वापरण्यासाठी एक योजना सुरू करून एक छोटीशी चळवळ सुरू केली जी जगातील सर्वात मोठा  एलईडी  वितरण कार्यक्रम ठरली यामुळे  दरवर्षी 45 अब्ज युनिट्सपेक्षा जास्त ऊर्जेची बचत होत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. जगातील सर्वात मोठा कृषी पंप सौरीकरण उपक्रम सुरू करण्यावर आणि 2030 पर्यंत भारताच्या देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत 10 दशलक्ष वार्षिक विक्रीच्या अंदाजाच्या मुद्द्यालाही त्यांनी स्पर्श केला. यावर्षी 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची अंमलबजावणी   सुरू करून 2025 पर्यंत संपूर्ण देशात याची व्याप्ती वाढवण्याचे  उद्दिष्ट आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भारतातील  कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठीपर्याय म्हणून देश  हरित हायड्रोजनवर  मिशन मोडवर काम करत आहे तसेच हरित  हायड्रोजन आणि त्याचे उप उत्पादन, वापर आणि निर्यात करण्याच्या दृष्टीने भारताला जागतिक केंद्रामध्ये रुपांतरीत करण्याचे  उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

शाश्वत, न्याय्य, किफायतशीर , सर्वसमावेशक आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण पुढे नेण्यासाठी जग जी 20 समुहाकडे  पाहत आहे हे लक्षात घेऊन,ग्लोबल साऊथला  सोबत घेऊन विकसनशील देशांसाठी किफायतशीर  वित्तपुरवठा सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला.  तंत्रज्ञानातील दरी भरून काढण्याचे मार्ग शोधणे, ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. भविष्यासाठी इंधनया विषयावर सहकार्य दृढ करण्याची पंतप्रधानांनी सूचना केली आणि हायड्रोजनसंदर्भातील  उच्च-स्तरीय तत्त्वे’ ,हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय  ग्रीड  आंतर- संलग्नतेमुळे  ऊर्जा सुरक्षा वाढू शकते आणि  या परस्पर फायदेशीर सहकार्याला भारत आपल्या शेजारी देशांसोबत प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी सांगितले. आंतर-संलग्न  हरित  ग्रिड्सच्या दृष्टीकोनाची पूर्तता केल्याने परिवर्तन होऊ शकते , हे आपल्या सर्वांना आपली हवामानसंबंधी  उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी , हरित गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि लाखो हरित रोजगार निर्मितीसाठी सहाय्य करेल, असे पंतप्रधान म्हणाले.आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या एक सूर्य, एक जग, एक  ग्रीड या हरित  ग्रिड उपक्रमामध्ये  सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी  सर्व सहभागी राष्ट्रांना आमंत्रण दिले.

सभोवतालची काळजी घेणे नैसर्गिक किंवा सांस्कृतिक असू शकते मात्र  ही भारताची  पारंपारिक सुजाणता आहे, जी पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी असलेल्या मिशन लाईफ (LiFE) या अभियानाला बळकटी देते. ही एक चळवळ  आपल्यापैकी प्रत्येकाला हवामान क्षेत्रातील उत्कृष्ट  बनवेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण कशाप्रकारेही  संक्रमण केले तरीही आपले विचार आणि कृती नेहमीच आपलया 'एका पृथ्वी' चे संवर्धन करण्यासाठी, आपल्या 'एका कुटुंबाच्या' हिताचे रक्षण करण्यासाठी आणि हरित अशा 'एका भविष्य' कडे वाटचाल करण्यासाठी सहाय्य्यकारी ठरली पाहिजे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.

***

N.Joshi/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941663) Visitor Counter : 89