पोलाद मंत्रालय
भारत-जपान द्विपक्षीय बैठकीत पोलाद क्षेत्रातील सहकार्य आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली
दोन्ही देशांनी आपापली निव्वळ शून्य उद्दिष्टे साध्य करण्यात सहकार्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला
Posted On:
20 JUL 2023 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि जपानचे अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्री निशिमुरा यासुतोशी यांच्यात आज नवी दिल्ली येथे पोलाद क्षेत्रातील सहकार्य आणि कार्बन वापर कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय बैठक झाली.
पोलाद क्षेत्रातील आर्थिक वाढ आणि कमी कार्बन संक्रमण या दोन्ही बाबींचा पाठपुरावा करण्याच्या मूलभूत तत्त्वासह प्रत्येक देशाच्या उद्योगाची परिस्थिती लक्षात घेऊन धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याच्या महत्त्वावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला. भारत आणि जपान हे जगातील दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे पोलाद उत्पादक तसेच जागतिक पोलाद उद्योगातील लाभात सह -भागीदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
भारतात अलिकडेच जपानी पोलाद उत्पादकांनी केलेल्या गुंतवणुकीचा विस्तार ओळखून, दोन्ही देशांच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्याला पाठिंबा देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला. यामुळे जागतिक पोलाद उद्योगाचा योग्य विकास होईल.
उभय देशांनी पोलाद कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मार्गांची विषमता ओळखून आपली निव्वळ शून्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्य महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला. हे सहकार्य सुरु ठेवण्यासाठी, पोलाद संवाद आणि इतर सहकार्यात्मक कार्यक्रमांद्वारे यापुढील चर्चा आयोजित करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला, ज्यामध्ये नोव्हेंबर, 2023 मध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाने ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्टील उत्पादनाचे डीकार्बनायझेशन करण्याबाबत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर भर दिला जाईल.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941057)
Visitor Counter : 106