विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि अमेरिका यांनी आज संयुक्तपणे ‘महत्त्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान : जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी क्वाटंम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता’ या संकल्पनेवर आधारित प्रस्ताव मागवले

Posted On: 18 JUL 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2023

अमेरिकेच्या उर्जा विभाग सचिव जेनिफर एम.ग्रॅनहोम यांनी आज नवी दिल्लीत नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री , केंद्रीय कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन दोन्ही देशांतील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली.

भारत आणि अमेरिकेने यावेळी संयुक्तपणे ‘महत्त्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान : जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी क्वाटंम तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता’ यासंबंधी प्रस्ताव मागवले. भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंच (आययुएसएसटीएफ)तसेच युएसआयएसटीईएफ  सचिवालय यांनी या कार्यक्रमाची आखणी केली आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की या स्पर्धात्मक अनुदान कार्यक्रमाच्या माध्यमातून युएसआयएसटीईएफ व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या समर्पक असलेल्या तसेच आशादायक संयुक्त अमेरिका-भारत तंत्रज्ञान नवोन्मेष आणि उद्योजकीय उपक्रमांची निवड करते आणि त्यांना मदत करते. हे संयुक्त उपक्रम मूलतः अमेरिकेतील असतील किंवा भारतातील स्टार्ट अप उद्योग, सरकार, शिक्षण क्षेत्र किंवा व्यावसायिक उपक्रमांतील असू शकतील, आणि त्यांचे कोणत्याही स्वरूपातील एकत्रीकरण असू शकेल, मात्र उपयोजित संशोधन आणि विकास कार्यक्रमांवर त्यांचा भर असला पाहिजे, व्यवसायाची योजना आणि व्यावसायिक संकल्पनेचा पुरावा याचा त्यात समावेश असला पाहिजे तसेच त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात शाश्वत व्यावसायिक क्षमता असली पाहिजे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की कृत्रिम बुद्धीमत्ता आणि क्वाटंम तंत्रज्ञान यांच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक परिवर्तनीय घडामोडी होतील आणि आरोग्य सुविधा, कृषी, हवामान बदल आणि इतर बाबींवर प्रभाव पडून आपल्या सामाजिक स्वास्थ्याला मोठा लाभ होईल. एंडॉवमेंट फंड मधील परिवर्तनीय क्षमतेचे त्यांनी स्वागत केले.

 हे प्रस्ताव दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्वीकारण्यात येतील आणि त्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या समर्पक असलेल्या तसेच आशादायक संयुक्त अमेरिका-भारत तंत्रज्ञान नवोन्मेष आणि उद्योजकीय उपक्रमांचे प्रस्ताव आमंत्रित केले जातील.

  

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1940534) Visitor Counter : 113