कृषी मंत्रालय
भारतीय कृषी संशोधन परिषदेने 95 वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिन केला साजरा
कृषी आणि बागायती उत्पादनाच्या निर्यातीतून प्राप्त महसुलाने 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडला: नरेंद्र सिंह तोमर
शेतीतून कार्बन क्रेडिट मिळवण्याची वेळ आली असून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो - परशोत्तम रुपाला
Posted On:
16 JUL 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2023
भारतीय कृषी संशोधन परिषदेने आज आपला 95 वा स्थापना दिन नवी दिल्लीतील पुसा स्थित राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल येथे साजरा केला.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि भारतीय कृषी संशोधन परिषद संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन-दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी देखील यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नवीन अभियानांद्वारे कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यात आली आहे असं तोमर म्हणाले. भारतातील कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर पसंती मिळत असून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात भरड धान्याला महत्त्व प्राप्त होत आहे असे त्यांनी नमूद केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे घडत आहे. कृषी आणि बागायती उत्पादनाच्या निर्यातीतून प्राप्त महसुलाने 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे असे ते म्हणाले. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीवर सरकार भर देत असून पर्यावरण-स्नेही शेतीला चालना देण्यासाठी 1500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करून स्वतंत्र अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच देशाला अनेक वस्तूंच्या निर्मितीत स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच अन्नधान्याचा निर्यातदार बनण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिलेल्या शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली.
दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या अनेक उपक्रमांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुपाला यांनी आयसीएआरची प्रशंसा केली. शेतीतून कार्बन क्रेडिट मिळवण्याची वेळ आली असून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो असे त्यांनी नमूद केले.
चौधरी यांनीही यावेळी आपले विचार मांडले आणि आयसीएआरचे कौतुक केले. 5 वर्षांनंतर आयसीएआर 100 वर्षे पूर्ण करेल आणि शताब्दी वर्षात साध्य करावयाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी ध्येय निश्चित करण्यासाठी धोरण आखण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्रात अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली आहे असे कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि आयसीएआर चे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940042)
Visitor Counter : 213