पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण


चित्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचे माध्यमांमधील वृत्त म्हणजे केवळ अफवा असून कोणत्याही वैज्ञानिक तथ्यावर आधारित नाही

Posted On: 16 JUL 2023 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2023

 

दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया मधून स्थानांतरित 20  चित्त्यांपैकी, कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच प्रौढ चित्यांच्या  मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने केलेल्या  प्राथमिक विश्लेषणानुसार सर्व मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. रेडिओ कॉलर आदींसह इतर कारणांमुळे  चित्ते  मृत्यू पावल्याचे वृत्त माध्यमांकडून दिले जात आहे. मात्र असे वृत्त  कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नाही तर अंदाज आणि ऐकीव माहितीवर आधारित आहे.

चित्ता प्रकल्पाला अजून एक वर्ष पूर्ण व्हायचे आहे आणि चित्ता परिचय हा दीर्घकालीन प्रकल्प असल्याने त्याबाबत यश आणि अपयशाच्या संदर्भात निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. गेल्या 10 महिन्यांत, या चीता प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांनी चित्ता व्यवस्थापन, देखरेख आणि संरक्षणाबाबत मौल्यवान ज्ञान प्राप्त केले आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प यशस्वी होईल अशी आशा असून या टप्यावर  अंदाज लावण्याचे कोणतेही कारण नाही.

स्थलांतरित चित्यांच्या जोपासनेचे प्रयत्न जारी

चित्ताच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करण्यासाठी, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातील आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ञ/ पशुवैद्यकीय डॉक्टरांशी नियमितपणे सल्लामसलत केली जात आहे. त्याचबरोबर विद्यमान देखरेख प्रोटोकॉल, संरक्षण स्थिती, व्यवस्थापकीय माहिती, पशुवैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण पैलूंचे स्वतंत्रपणे राष्ट्रीय तज्ञांकडून पुनरावलोकन केले जात आहे. चित्ता प्रकल्प सुकाणू समिती या प्रकल्पावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबरोबरच बचाव, पुनर्वसन, क्षमता वृद्धी , यासह चित्ता संशोधन केंद्राची स्थापना करणे; लँडस्केप पातळी व्यवस्थापनासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अतिरिक्त वनक्षेत्र आणणे; अतिरिक्त फ्रंटलाइन कर्मचारी प्रदान करणे; चित्ता संरक्षण दलाची स्थापना; आणि मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान निर्माण करण्याचे विचाराधीन आहे.

7 दशकांनंतर चित्ता भारतात परत आणला  आहे. अशा  महत्वाच्या  प्रकल्पात चढ-उतार होतच राहणार  आहेत. जागतिक अनुभव विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील अनुभव सूचित करतो की आफ्रिकन देशांमध्ये चित्ता आणल्यानंतर  प्रारंभिक  टप्प्यात 50% पेक्षा जास्त चित्तांचा मृत्यू झाला आहे. चित्त्यांचा मृत्यू त्यांच्या प्रजातीच्या वन्यप्राण्यांमधील  मारामारी, रोग, सोडण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर झालेल्या अपघातांमुळे होऊ शकतो, भक्ष्याची शिकार करताना झालेली दुखापत, शिकार, रस्त्यावरील वाहनांची ठोकर , विषबाधा आणि इतर शिकारी हल्ला इत्यादींमुळे देखील मृत्यू होऊ शकतो. या सर्व घटनांचा विचार करून  कृती आराखड्यात नव्याने आणलेल्या वन्यजीवांची एकूण संख्या आणि अनुवांशिक रचना यांचे व्यवस्थापन  करण्यासाठी पूरक  तरतूद केली आहे.

 

पार्श्वभूमी

केंद्र सरकारने चित्ता भारतात परत आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.  मध्य प्रदेश वन विभाग, भारतीय वन्यजीव संस्था आणि नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतील चित्ता तज्ञ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत असलेली वैधानिक संस्था  प्रोजेक्ट चित्ताची अंमलबजावणी करत  आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी “चित्ता भारतात परत आणण्यासाठीचा  कृती आराखडा” नुसार केली जात असून  प्रकल्पाच्या देखरेखीसाठी तज्ञ/अधिकारी यांचा समावेश असलेली एक सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहेत जे सरिस्का आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पात सर्वप्रथम वाघांना परत आणण्याच्या यशस्वी मोहिमेत सहभागी झाले होते.

आंतरखंडीय वन्यजीवाचे स्थानांतरण करण्याच्या पहिल्यावहिल्या मोहिमेत  प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात  एकूण 20 रेडिओकॉलर्ड चित्ते आणण्यात आले होते. अनिवार्य विलगीकरण  कालावधीनंतर, सर्व चित्त्यांना मोठ्या पिंजऱ्यात (अ‍ॅक्लिमेटायझेशन एन्क्लोजर) हलवण्यात आले. सध्या, 11 चित्ते मुक्तपणे वावरत असून भारतीय भूमीवर जन्मलेल्या एका बछड्यासह 5 चित्ते  विलगीकरणाच्या पिंजऱ्यात  आहेत. मुक्तपणे वावरत असलेल्या चित्त्यांवर  एका समर्पित देखरेख पथकाद्वारे चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

भारत सरकारने क्षेत्रीय अधिकार्‍यांशी समन्वय साधून काम करण्यासाठी समर्पित राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अधिकाऱ्यांचा एक चमू तैनात केला आहे. हा चमू फिल्ड मॉनिटरिंग चमू सोबत एकत्रित केलेल्या रिअल टाईम फील्ड डेटाचे विश्लेषण करेल आणि योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आरोग्य आणि संबंधित हस्तक्षेपांसह विविध व्यवस्थापन पैलूंवर निर्णय घेईल.

 

* * *

N.Chitale/Sushma/Vikas/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939992) Visitor Counter : 206