वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरल (पार्क)चा अमरावती येथे शुभारंभ


पीएम मित्र पार्क महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला अधिक बळकटी प्रदान करेल : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 16 JUL 2023 6:07PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जुलै 2023

 

महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल रिजन अँड अॅपेरल (पार्क) चा आज शुभारंभ करण्यात आला. या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश उपस्थित होते. यावेळी  राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव श्रीमती रचना शहा, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अतिशय महत्त्वाच्या पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचा आरंभ होत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे अभिनंदन केले. पंतप्रधान मित्र टेक्सटाईल पार्कमुळे महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला अधिक बळ मिळेल, यावर त्यांनी भर दिला. फार्म ते फायबर, फॅक्टरी, फॅशन टू फॉरेन अशा संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीत महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, टेक्सटाइल पार्कसाठी अमरावती ही एक नैसर्गिक निवड असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.

रस्ते, रेल्वे, बंदर आणि विमानतळाच्या जाळ्यासह अमरावतीच्या सुसज्ज पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला चालना मिळेल, असे गोयल यांनी नमूद केले.

केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी वस्त्रोद्योग केंद्र म्हणून भारताच्या ऐतिहासिक सामर्थ्याची दखल घेत अमरावती, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पीएम मित्र टेक्सटाईल पार्कची स्थापना हे भारताला जागतिक वस्त्रोद्योग उत्पादन केंद्र बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यावर भर दिला. एकात्मिक वस्त्रोद्योग हबमुळे महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात नावीन्य, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या.

   

कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयादरम्यान पीएम मित्र पार्क च्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

अमरावती येथील पीएम मित्र टेक्सटाईल पार्कमध्ये 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे तीन लाख व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

   

अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) लागून असलेल्या नांदगाव पेठेतील 1020 एकर जागेत पसरलेला टेक्सटाईल पार्क मुंबई नागपूर समृद्धी महामार्गापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आणि जवळच्या वर्धा ड्राय पोर्टपासून 147 किलोमीटर अंतरावर आहे. ब्राऊनफिल्ड पार्क म्हणून, येथे रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

 

* * *

PIB Mumbai | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939989) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil