आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामी स्वास्थ्य चिंतन शिबीर महत्वाची भूमिका बजावेल: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय 

Posted On: 15 JUL 2023 2:18PM by PIB Mumbai

 

समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामी स्वास्थ्य चिंतन शिबीर महत्वाची भूमिका बजावेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. देहरादून येथे आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय स्वास्थ्य चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवसाचे अध्यक्षपद भूषविताना ते बोलत होते. या शिबिरामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये आपण सर्वांनी भारताच्या आरोग्य क्षेत्राचा तपशीलवार आढावा घेतला, आणि सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी मार्गक्रमण करण्याची दिशा निश्चित केली, असे ते यावेळी म्हणाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंह बघेल यावेळी उपस्थित होते. धनसिंग रावत (उत्तराखंड), रजनी विदादला (आंध्र प्रदेश), अलो लिबांग (अरुणाचल प्रदेश), केशब महंता (आसाम), ऋषिकेश पटेल (गुजरात), बन्ना गुप्ता (झारखंड), दिनेश गुंडू राव (कर्नाटक), सपम रंजन सिंग (मणिपूर), डॉ. आर. लालथ्यांगलियाना (मिझोरम), थिरू मा. सुब्रमण्यम (तामिळनाडू), यांच्यासह इतर राज्यांचे आरोग्य मंत्री या विचारमंथन संमेलनात सहभागी झाले. 

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाबद्दल बोलताना डॉ. मांडवीय म्हणाले, देशासमोर असणाऱ्या क्षयरोगाच्या (टीबी) समस्येचा भार कमी करण्यासाठी लोक भागीदारी, अर्थात जनसहभाग हा अत्यंत आवश्यक घटक आहे. क्षयरोग निर्मुलनाबाबतचा आपला दृष्टीकोन, भारताचा आरोग्य सेवेकडे बघण्याचा दृष्टीकोन दर्शवतो. लोकांनी नी-क्षय मित्र बनण्यासाठी पुढे यावे, असे मी आवाहन करतो, कारण यामुळे भारताला क्षयरोग मुक्त करण्याच्या कामी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठता येईल. राज्यांनी क्षयरोग निर्मुलनाला प्राधान्य द्यावे, आणि या उपक्रमाला आणखी चालना द्यावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यांनी अपंगत्व (दिव्यांग) प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सोपी करून दिव्यांग जनतेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.      

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल, या स्वास्थ्य चिंतन शिबिराला संबोधित करताना म्हणाले, या शिबिराला उपस्थित सहभागींच्या योगदानामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये आरोग्य सेवेबाबतचा एक सर्वसमावेशक दृष्टीकोन निश्चित झाला आहे, आणि या ठिकाणी आपण केलेला ठराव प्रत्यक्ष कृतीत आणणेही आवश्यक आहे. जेणेकरून आपली उद्दिष्टे पुढील वर्षापर्यंत पूर्ण करता येतील. 

    

या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भारतातील आजच्या आरोग्य सेवेशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयुष्मान भव, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, गोवर आणि रुबेला निर्मूलन तसेच पीसीपीएनडीटी कायदा, यासह इतर मुद्द्यांचा समावेश होता.

***

M.Pange/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939754) Visitor Counter : 128