राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय अभ्यागत परिषदेचा आज झाला समारोप

Posted On: 11 JUL 2023 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2023

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अभ्यागत परिषदेचा आज 11 जुलै 2023 रोजी समारोप झाला.

या परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ‘शाश्वत विकासाकरिता शिक्षण- एका चांगल्या भविष्याची उभारणी’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी वेगवेगळ्या पाच गटांनी एनईपी-2020 राबवण्यासाठी योगदान, आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रयत्न आणि जी20, संशोधन योगदान आणि मान्यता, विविधता, समानता, समावेशकता आणि निरामयता, अमृतकाळासाठी योजना आणि कृती घटक या उप-विषयांवर देखील विचारमंथन केले. या विचारमंथनातून काढलेला निष्कर्ष राष्ट्रपतींना सादर करण्यात आला.  

या कार्यक्रमाच्या समारोप संबोधनात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की या परिषदेचा मुख्य विषय आणि उप-विषय आपल्या देशासाठी त्याचबरोबर संपूर्ण जगासाठी देखील अतिशय महत्त्वाचे होते. या परिषदेत मांडण्यात आलेले विचार मुद्देसूद आणि कृती करण्यायोग्य आहेत, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.

प्रत्यक्ष वापरात आल्यानंतरच धोरणाचे महत्त्व सिद्ध होते असे त्यांनी सांगितले. धोरणाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाली आहे हे फलनिष्पत्ती आणि परिणामातून सिद्ध होते, असे त्या म्हणाल्या. ‘आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रयत्न आणि जी20’ या विषयावरील चर्चा भारताला एक ज्ञान महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी अतिशय संदर्भयोग्य आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. सध्याच्या जागतिक आव्हानांवर जी20 देशांसोबत एकत्रितपणे उपाययोजना शोधण्यासाठी भारत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या मंत्रासह प्रयत्न करत आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. 

‘संशोधन योगदान आणि मान्यता’ या उप-विषयासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की आपल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाची महासत्ता  बनण्याची क्षमता आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक उद्देशाने वापर करता येऊ शकेल, अशा प्रकारच्या नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रमुख त्यांच्या संस्थांचे नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विविधता, समानता, समावेशकता आणि निरामयता’ यावर एक विशेष सत्र आयोजित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली आणि सांगितले की उच्च शिक्षण संस्था आपल्या राज्यघटनेतील न्याय,समता, बंधुता, व्यक्तिगत सन्मान आणि महिलांचा आदर या मूल्यांची जोपासना करणाऱ्या सर्वात प्रभावी मंचांमध्ये समाविष्ट आहेत. आपल्या उच्च शिक्षण संस्था जागतिक दर्जाची ज्ञान निर्मिती केंद्रं बनतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

 राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Kane/S.Patil/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1938810) Visitor Counter : 131