कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसाठी उद्या बँकर्स जनजागृती कार्यशाळा

Posted On: 09 JUL 2023 7:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतनधारकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन सुलभ व्हावे, या उद्देशाने अनेक कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या आहेत तसेच निवृत्ती वेतनासंबधीत प्रक्रियांचे डिजिटलायझेशन सुरू केले आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये निवृत्तीवेतन नियमांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि याबाबत अनेक स्पष्टीकरण आदेश/सूचना जारी करण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2021 मध्ये हे सर्व आदेश आणि सूचना एकत्रित करून केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 2021 म्हणून सादर करण्यात आले.

बँका याच प्रमुख निवृत्ती वेतन वितरण प्राधिकरण असल्यामुळे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने बँकांच्या केंद्रीय निवृत्तीवेतन प्रक्रिया केंद्र (CPPCs) तसेच बँकेतील निवृत्ती वेतनासंबंधित कामे हाताळणाऱ्या त्यांच्या क्षेत्रीय पदाधिकाऱ्यांसाठी जागरुकता कार्यशाळांची मालिका सुरू केली आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा एक गट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्याच्या उद्देशाने श्रीनगर येथे दाखल झाला आहे.

या कार्यशाळांचा उद्देश निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या बँकांमध्ये या संबंधित विविध नियम आणि प्रक्रियांबद्दल जागरूकता पसरवणे आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी "जीवन सुलभता" सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारकडून उचलल्या जाणार्‍या पावलांबद्दल जागरूकता पसरवणे हाच आहे. या कार्यशाळांमध्ये बँक अधिकाऱ्यांना या प्रक्रिया हाताळताना येणाऱ्या समस्यांवर आणि निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींवर लक्ष केंद्रित केले जाईल तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पाठवलेल्या सूचनाही लक्षात घेतल्या जातील.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यांसाठी ही कार्यशाळा 10 आणि 11 जुलै 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत केंद्रीय निवृत्तीवेतन प्रक्रिया केंद्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवृत्ती वेतन व्यवहार शाखांमधील 50 हून अधिक अधिकारी सहभागी होणार आहेत. 2023-24 मध्ये याच धर्तीवर इतर निवृत्तीवेतन वितरण बँकांच्या सहकार्याने बँकर्स जागरूकता कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1938333) Visitor Counter : 260


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu