नौवहन मंत्रालय

भारतातील 75 ऐतिहासिक (आयकॉनिक) दीपगृहांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले मोहिमेचे उद्घाटन

Posted On: 01 JUL 2023 7:57PM by PIB Mumbai

 

भारतातील 75 ऐतिहासिक दीपस्तंभांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज एक मोहीम सुरू केली. गुजरातमधील द्वारका येथे द्वारका, गोपनाथ आणि वेरावळ या तीन सुधारित दीपगृहांचे पर्यटन स्थळात रूपांतर करून त्यांचे आज अनावरण करण्यात आले. या दीपगृहांच्या उद्घाटनाने ही मोहीम सुरू झाली आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने या तीन दीपगृहांचे पुरेशा सुविधांसह नूतनीकरण केले आहे.  भारतातील वैशिष्ट्यपूर्ण दीपगृहांना आकर्षक पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनाशी ही मोहीम सुसंगत आहे. पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या भव्य वास्तूंची समृद्ध संस्कृती, महत्त्व आणि आकर्षकता दर्शविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तत्पूर्वी सूरत येथे सीआयआय बी 20 बैठकीला सोनोवाल उपस्थित राहिले. तिथे त्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि भारताच्या सांस्कृतिक पैलूंच्या विविध आयामांच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीवर सोनोवाल यांनी प्रकाश टाकला. भारतातील समृद्ध अंतर्देशीय जलमार्ग क्षेत्रात बी2बी आणि बी2सी या दोन्ही व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

किफायतशीर आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असलेला, अंतर्देशीय जलमार्गाचा पर्याय मालवाहतुकीसाठी निवडण्याचे आवाहन सोनोवाल यांनी व्यावसायिकांना केले. गंगा विलास या जगातील सर्वात लांब नदीवरील जलपर्यटनाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर नर्मदा विलास, गोदावरी विलास, महानदी विलास, कावेरी विलास' आणि इतर रिव्हर क्रूझवरील नावीन्यपूर्ण अनुभवांनंतर नदीतील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन सोनोवाल यांनी केले.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936798) Visitor Counter : 141