संरक्षण मंत्रालय
भारत-फ्रान्स नौदलाच्या सागरी भागीदारी सरावाचा विशाखापट्टणममध्ये समारोप
Posted On:
01 JUL 2023 3:13PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाचे क्षेपणास्त्रभेदी मार्गदर्शक प्रणालीने सुसज्ज जहाज आयएनएस राणा आणि स्वदेशी बनावटीचे सागरी किनारा गस्ती जहाज आयएनएस सुमेधा, या दोन जहाजांनी 30 जून 2023 रोजी बंगालच्या उपसागरात फ्रान्सच्या नौदलाचे जहाज एफ एस सुरकॉफ (FS Surcouf) सोबत सागरी भागीदारी सराव (MPX) केला. फ्रेंच नौदलाच्या लाफायेत (LaFayette) वर्गातल्या फ्रिगेट सुरकॉफ या जहाजाने 26 ते 29 जून 2023 या कालावधीत विशाखापट्टणमला भेट दिली आणि भारतीय नौदलाच्या जहाजांसह विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये व्यावसायिक आणि सामाजिक संवाद, क्रीडा सामने आणि परस्परांच्या जहाजांवरील भेटींचा समावेश होता.
विशाखापट्टणमहून निघताना,फ्रिगेट सुरकॉफ (FS Surcouf) जहाजाने राणा आणि सुमेधा या भारतीय जहाजांसोबत विविध सराव केले, ज्यात सामरिक कौशल्ये, समुद्रामध्ये पुनर्भरण (RAS) दृष्टीकोन, लढाऊ विमानाविरूद्ध हवाई संरक्षण आणि परस्पर जहाजांवरील हेलिकॉप्टर संचलन आदी सैनिकी कारवायांचा समावेश होता. दोन्ही देशांच्या नौदलांमधील घनिष्ठ मैत्रीला बळकटी देणार्या जहाजांदरम्यानच्या पारंपरिक निरोप संचलनाने या सागरी भागीदारी सरावाचा समारोप झाला.फ्रिगेट सुरकॉफ (FS Surcouf) जहाजाच्या भारत भेटीमुळे भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ झाले, तसेच या भेटीने दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये आंतरकार्यक्षमता आणि मजबूत बंध प्रस्थापित केले.
या आधी, याच वर्षी, फ्रिगेट लाफायेत(FS La Fayette) आणि मिस्ट्रल- वर्गाच्या जमिनीवरील आणि समुद्रावरील आक्रमणासाठी उपयोगी ठरणाऱ्या एफएस डिक्समूड (FS Dixmude) या दोन जहाजांनी 10 - 11 मार्च 2023 दरम्यान आयएनएस सह्याद्री या क्षेपणास्त्र वाहक जहाजांसोबत सागरी भागीदारी सराव केला होता.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936750)
Visitor Counter : 148