मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

मत्स्यव्यवसाय क्षेत्र प्राथमिक स्तरावर 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान करते: परशोत्तम रुपाला


जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8% वाटा असलेला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे: रुपाला

Posted On: 28 JUN 2023 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्ली येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागील 9 वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती दिली. भारतात मत्स्यव्यवसाय या आश्वासक क्षेत्राने 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना प्राथमिक स्तरावर आणि मूल्य श्रृंखलेतील लाखो  लोकांना उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान केले असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. हे क्षेत्र उच्च परतावा देखील देत असल्याचे ते म्हणाले. जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8% वाटा असलेला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे. गेल्या नऊ वर्षात भारत सरकारने मत्स्यपालन आणि मत्स्यसंवर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि मत्स्यपालक आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवर्तनकारक उपक्रम हाती  घेतल्याचे  रुपाला यांनी पुढे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी काही प्रमुख उपक्रम आणि फल निष्पत्ती यावर प्रकाश टाकला:

  • मत्स्यपालन क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक: गेल्या 9 वर्षांमध्ये भारत सरकारने मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन क्षेत्रात गुंतवणूक वाढवली असल्याची माहिती रुपाला यांनी दिली. आहे. 2015 पासून, केंद्र सरकारने 38,572 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीला मान्यता दिली आहे किंवा गुंतवणूक जाहीर केली आहे.
  • विक्रमी राष्ट्रीय मत्स्य उत्पादन: गेल्या 9 वर्षांमध्ये, भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन 95.79 लाख टन (2013-14 अखेर) वरून 162.48 लाख टन (2021-22 च्या शेवटी) पर्यंत वाढले आहे, म्हणजेच सुमारे 66.69 लाख टनांची वाढ नोंदवली गेली. याशिवाय, वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय मत्स्य उत्पादन 2013-14 च्या तुलनेत 81% वाढ नोंदवत 174 लाख टना पर्यंत (तात्पुरते आकडे) पोहोचणे किंवा त्याहून अधिक होणे अपेक्षित आहे.
  • दुप्पट सागरी खाद्य निर्यात: केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की, 2013-14 पासून भारतातील समुद्री खाद्य निर्यात दुप्पटीहून अधिक झाली आहे. 2013-14 मध्ये समुद्री खाद्याची निर्यात 30,213 कोटी रुपये होती, त्यामध्ये वाढ होऊन 2022-23 या आर्थिक वर्षात जागतिक बाजारपेठ महामारीने लादलेल्या आव्हानांना तोंड देत असूनही ती 111.73% ने वधारुन 63,969.14 कोटी रुपयांवर पोहोचली. आज, भारतीय समुद्री खाद्य 129 देशांमध्ये निर्यात केले जाते आणि भारताचा सर्वात मोठा आयातदार अमेरिका आहे.
  • मच्छीमार आणि मत्स्यशेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे संस्थात्मक क्रेडिट: भारत सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षापासून सुरू केलेली किसान क्रेडिट कार्ड सुविधा मच्छिमार आणि मत्स्यशेतकऱ्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करत आहे अशी माहिती रुपाला यांनी दिली. आत्तापर्यंत मच्छिमार आणि मत्स्यपालकांना 1,42,458 किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात रुपाला यांनी खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन उत्पादन दुप्पट करणे, शाश्वत वाढीचा दर आणि राष्ट्रीय सकल मूल्यवर्धन (GVA) तसेच कृषी क्षेत्रातील मधील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे वाढलेले योगदान, मासेमारी बंदर (FHs) आणि मत्स्य उत्पादन केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे, सागर परिक्रमा यात्रा, प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत गट अपघात विमा योजना (GAIS) यासारख्या इतर उपक्रम आणि योजनांबाबत देखील माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936097) Visitor Counter : 133


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi