निती आयोग
azadi ka amrit mahotsav

स्टार्ट अप 20 प्रतिबद्धता गटाच्या गुरुग्राम इथल्या अंतिम शिखर बैठकीत, ह्या गटाच्या वर्षपूर्तीचा उत्सव होणार साजरा

Posted On: 27 JUN 2023 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत, स्टार्ट अप-20 प्रतिबद्धता गटाची 3 आणि 4 जुलैला, ‘स्टार्टअप20 शिखर’ ही बैठक होणार आहे.

ह्या परिषदेला ‘शिखर परिषद’ असे यथोचित नाव देण्यात आले आहे  कारण, शिखर शब्द, कोणाच्याही  कामगिरीचे सर्वोच्च शिखर व्यक्त करणारे आणि जागतिक स्टार्ट अप व्यवस्थेच्या भविष्याला आकार देणारे आहे.

अंतिम धोरण आराखडा तयार करण्यात आणि त्याच्या अधिकृत प्रकाशनात, ह्या गटाची भूमिका महत्वाची ठरते. ह्या सर्वसमावेशक मसुदा दस्तऐवजात, स्टार्ट अप20 प्रतिबद्धता गटाच्या सामूहिक ज्ञान आणि अथक परिश्रमांचे प्रतिबिंब आढळते. या गटात, जी-20 सदस्य देशांचे तसेच इतर निमंत्रित देशांचे मान्यवर प्रतिनिधी आहेत. ह्या धोरण मसुद्यातून, परिवर्तनात्मक आणि सर्वसमावेशक अशा स्टार्ट अप व्यवस्थेचा पाया रचला जाणार आहे. ज्याद्वारे, आर्थिक विकास, नवोन्मेष आणि आंतरदेशीय सहकार्य साध्य केले जाणार आहे.

दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत, विविध आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे कार्यक्रम होणार आहेत. ज्यात महत्वाच्या विषयावरील चर्चासत्रे, प्रबोधनपर सादरीकरणे आणि अत्यंत मौल्यवान अशा नेटवर्किंग संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच, ह्या प्रतिनिधींना, उद्योग क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि विचारवंत अशा लोकांशी चर्चा करण्याची संधी मिळेल. ज्यातून धोरणात्मक संघटनाला प्रेरणा मिळेल, जागतिक पातळीवरील  स्टार्ट अपच्या प्रवासाला एक गती, एक आकार देता येईल.

जागतिक स्टार्ट अप व्यवस्था उभरण्याविषयीच्या चर्चेसोबतच, ह्या शिखर परिषदेत, भव्य स्टार्ट अप संमेलन देखील होईल. जिथे, स्टार्ट अप कंपन्या त्यांची उत्पादने आणि सेवा यांचे प्रदर्शन तर करतीलच, त्याशिवाय, गुंतवणूकदारांशीही चर्चा करतील, तसेच या क्षेत्रातील मार्गदर्शकांची सत्रे, आणि इतर लोकांशी विचारांची देवघेव, संपर्क वाढवण्याच्या संधी मिळतील. इतर स्टार्ट अप 20 बैठकांप्रमाणेच यावेळीही, ह्या परिषदेत कला आणि संस्कृतीचा एक सुदृढ संगम बघायला मिळेल.

स्टार्ट अप 20 चे अध्यक्ष, डॉ. चिंतन वैष्णव यांनी ह्या बैठकीबद्दल उत्साह दर्शवत सांगितले, “स्टार्ट अप 20 च्या प्रवासातील हा शेवटचा टप्पा, एक नवा प्रारंभ ठरेल, असं मला वाटतं. आम्ही आमच्या सर्व प्रतिनिधींना गुरुग्राम च्या ह्या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देतो. गेले कित्येक महीने, आपण केलेली कामे, चर्चा आणि दृढनिश्चय यांची परमोच्चता  अनुभवण्यासाठी उत्सवात सहभागी होण्याची विनंती करतो”

जागतिक स्टार्टअप व्यवस्थेच्या भविष्याला आकार देण्याच्या उद्देशाने, भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत,  स्टार्टअप20 प्रतिबद्धता गट कार्यरत आहे. जी-20 राष्ट्रे आणि आमंत्रित देशांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेला स्टार्टअप20 हा गट, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक प्रभावासाठी स्टार्टअप्सची पूर्ण क्षमता वापरण्यासाठी,  अभिनव कल्पना, सहकार्य आणि सर्वसमावेशकता वाढवण्याचा प्रयत्न करतो.

 

* * *

S.Kakade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935700) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu