संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुनर्वसन महासंचालनालयाने माजी सैनिकांसाठी रोजगार निर्माण करण्याकरता खाजगी क्षेत्रासोबत केला सामंजस्य करार

Posted On: 27 JUN 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत  पुनर्वसन महासंचालनालयाने (DGR) माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि त्यांना सुविहितरित्या नागरी मनुष्यबळ प्रवाहात आणण्यासाठी आयबीएमसह सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराद्वारे, आयबीएम कंपनीत निर्माण होणाऱ्या संबंधित नोकरीच्या संधींसाठी माजी सैनिकांच्या समृद्ध प्रतिभेचा उपयोग करण्याकरता डीजीआर आयबीएमसह समन्वय राखेल. 

माजी सैनिकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी उत्तम संधी प्रदान करून, लष्करी सेवा आणि नागरी नोकऱ्या यांच्यातील अंतर भरून काढणे हे या कराराअंतर्गत आयबीएमचे उद्दीष्ट आहे. कंपनीतील विविध खुल्या पदांसाठी योग्य कौशल्ये आणि योग्यता असलेले माजी सैनिक हुडकण्यासाठी डीजीआर आणि आयबीएम सतत सहकार्य करतील.  उमेदवारांचे मूल्यांकन आणि छाननी केल्यानंतर, त्या नोकरीसाठी माजी सैनिकांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि कौशल्यवर्धन सुलभ करण्यासाठी आयबीएम आपल्या संसाधनांचा आणि कौशल्याचा उपयोग करेल.

“IBM India सोबतची आमची भागीदारी आमच्या माजी सैनिकांना उद्योग आणि कॉर्पोरेट्समध्ये व्यापक पट खुला करेल. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल आणि माजी सैनिकांना सन्माननीय दुसरे करिअर प्रदान करेल” असे पुनर्वसन महासंचालक मेजर जनरल शरद कपूर यावेळी म्हणाले.

विशेष म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या एका वर्षात 24,234 माजी सैनिकांना विविध क्षेत्रात लाभदायक रोजगार मिळाला आहे.  सशस्त्र दलांमधे तरुणांचे प्रमाण राखण्यासाठी, दरवर्षी अंदाजे 60,000 कर्मचारी तुलनेने तरुण वयाताच सेवानिवृत्त केले जातात. दुसऱ्या करिअरद्वारे त्यांचे पुनर्वसन सुलभ करण्यासाठी, कॉर्पोरेट आणि उद्योग जगताच्या गरजांवर जोर देऊन अतिरिक्त कौशल्ये आत्मसात करण्यासाठी माजी सैनिकांना डीजीआर मदत करते. 

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935696) Visitor Counter : 158