शिक्षण मंत्रालय
जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन
"शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा पायाच उभा राहिलेला नाही, तर त्या पलीकडेही शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकारही देत आहे.”- पंतप्रधान नरेंद्र मोदी
“आपले उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच असले पाहिजे”- पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जी-20 शिक्षण मंत्र्यांची बैठक
Posted On:
22 JUN 2023 7:25PM by PIB Mumbai
पुणे, 22 जून 2023
पंतप्रधान मोदी यांनी आज पुण्यात झालेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली, जी-20 सदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला, जी-20 सदस्य देशांच्या मंत्र्यांसह 80 प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि युनिसेफ, यूनेस्को तसेच ओईसीडी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, पायाच उभा नाही, तर शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला, आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा ‘स्वयं’ ह्या ऑनलाईन शिक्षण मंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.34 दशलक्षाहून अधिक जणांची नोंदणी आणि 9000 हून अधिक अभ्यासक्रमांसह, हे एक अतिशय प्रभावी शिक्षण साधन बनले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे शालेय शिक्षण देण्याचा उद्देश असणाऱ्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ किंवा ‘दीक्षा पोर्टल’चाही उल्लेख केला. दिक्षा पोर्टलद्वारे 29 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमध्ये शिक्षण घेता येते आणि या पोर्टलद्वारे आतापर्यंत 137 दशलक्षाहून अधिक जणांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आहेत. भारताला आपला हा अनुभव आणि संसाधने विशेषत्वाने ग्लोबल साऊथमधील देशांबरोबर सामायिक करण्यात आनंद वाटेल हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.
उद्घाटन सत्रात शिक्षण मंत्री, जी-20 देशांचे प्रतिनिधी आणि युनेस्को, युनीसेफ तसेच आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या (OECD) अधिकार्यांचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले. जी-20 च्या भारतीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिक्षण कार्य गटाने शिक्षणाची सर्वांना उपलब्धता, गुणवत्ता आणि परिणाम सुधारण्यासाठी संयुक्त कृती करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी याप्रसंगी केला.
शिक्षण आणि कौशल्य विकासात केलेली गुंतवणूक ही मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असल्याचे ते म्हणाले. ज्ञान, कौशल्ये तसेच सामाजिक-आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या संधींद्वारे अधिक न्याय्य आणि समृद्ध जगाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-20 सदस्य आणि आमंत्रित देश एकत्र आले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
उत्तम प्रशासनासह मानवतेचे कल्याण आणि दर्जेदार शिक्षण या पंतप्रधानांच्या संकल्पनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिक्षणाने भू-राजकीय सीमा ओलांडल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. जगातील सर्व मुले आणि तरुणांना सर्वांगीण शिक्षणाचा फायदा होईल तसेच तरुण पिढी 21 व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज असेल हे आपण सर्वांनी एकत्रित येऊन सुनिश्चित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
2023 मधील जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील फलनिष्पत्ती , धोरणात्मक दिशानिर्देश आणि वचनबद्धतेचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ब्राझीलच्या आगामी जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी भारत पाठिंबा देईल असे आश्वासनही त्यांनी दिले. शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्राझीलसोबत काम करण्यास तयार असून जी-20 शिक्षण कार्य गट व्यासपीठाला सकारात्मक बदलाचे आश्रयस्थान बनवू, असेही ते म्हणाले.
जी-20 भारतीय अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील सहयोगी कृती मंत्रिस्तरीय प्रतिबद्धतेच्या पलीकडे गेली असून शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेमध्ये पसरलेल्या 5.2 कोटी भागधारकांचा सहभाग दिसून आल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. यातून‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेत भर दिल्याप्रमाणे 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भावनेला मूर्त रूप मिळत असल्याचे ते म्हणाले.
नंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इतर मान्यवरांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ब्राझिलचे शिक्षणमंत्री कॅमिलो संताना यांनी पुढच्या वर्षीच्या अजेंडयासाठी तीन महत्वाच्या विषयांचा प्रस्ताव मांडला. पहिले म्हणजे, त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर दिला, सर्व जी-20 देशांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे , असे त्यांनी सांगितले. तर दुसरा मुद्दा म्हणजे, सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील मंचांवर या सर्व बाबींशी संबंधित माहितीच्या आदानप्रदानासाठी एक यंत्रणा विकसित करणे, आणि शेवटचा मुद्दा मांडतांना संताना यांनी शाळांसाठी सामुदायिक सहभागाच्या महत्त्वावर भर दिला.
आपल्या भाषणात , इंडोनेशियाच्या शिशु शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण तसेच संस्कृती आणि शिक्षण मंत्रालयाचे महासंचालक आणि G-20 शिक्षण कार्यगटाचे सह-अध्यक्ष, डॉ. इवान स्याहरिल,यांनी भारताच्या अतुलनीय सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले. भारताची जडणघडण करणाऱ्या समृद्ध आणि विविधांगी परंपरांचीही त्यांनी प्रशंसा केली.
शिक्षण कार्यगटाने चार प्राधान्य क्षेत्रांवर भर दिला आहे. ती खालीलप्रमाणे :-
- शिक्षणात, विशेषतः मिश्र शिक्षण पद्धतीत, पायाभूत साक्षरता आणि अंकओळख सुनिश्चित करणे.
- तंत्रज्ञान- युक्त शिक्षण प्रत्येक स्तरावर अधिक सर्वसमावेशक, दर्जेदार आणि सहकार्यात्मक बनवणे,
- भविष्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेऊन, क्षमता बांधणी आणि तहहयात अध्ययनशीलतेला प्रोत्साहन देणे.
- संशोधनाला पाठबळ देणे, समृद्ध सहकार्य आणि भागीदारीच्या मार्गाने नवोन्मेशाला प्रोत्साहन देणे.
जी-20 शिक्षण कार्यगटाची चौथी बैठक, “मिश्र अध्ययनाच्या संदर्भात पायाभूत साक्षरता आणि अंकओळख सुनिश्चित करणे” या संकल्पनेवर आधारित होती. आज पुण्यात जी 20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीने याची सांगता झाली. G20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीपूर्वी लोकसहभाग कार्यक्रम, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख यावरील राष्ट्रीय परिषद, शिक्षण आणि डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकास, या क्षेत्रात अवलंबल्या जाणार्या नाविन्यपूर्ण पद्धती दर्शविणारे प्रदर्शन असे कार्यक्रम आयोजित केले गेले होते.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934596)
Visitor Counter : 142