वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नववा आंतरराष्ट्रीय योग दिन मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे साजरा
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य समारंभाचे केलेले नेतृत्व ही देशवासियांसाठी गौरवाची बाब – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
21 JUN 2023 4:50PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2023
9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे साजरा करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेतल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य समारंभाचे नेतृत्व करत आहेत ही देशवासियांसाठी गौरवाची बाब असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गोयल यांनी योगाभ्यासाचे महत्त्व विशद करण्यासाठी, कोविड काळात त्यांना आलेला अनुभव सांगितला. सातत्यपूर्ण प्रयत्न, व्यापक दूरदृष्टी, आणि प्रेरणा याद्वारे पंतप्रधानांनी आंतर राष्ट्रीय योगदिनाच्या रूपाने, योगशास्त्राला जगाच्या मंचावर प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. आणि तेव्हापासून, म्हणजे 2015 पासून 21 जून ला दरवर्षी जगभरात योगदिन साजरा केला जात आहे, असे गोयल म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आणि दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी सातत्याने योगाभ्यास करावा, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांशी यावेळी संवाद साधला आणि योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी योग गुरु सुरेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने केली.
मुंबई बंदर प्राधिकरण, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पतंजली योगपीठ भारत स्वभिमानचे सहकार्य लाभले. यावेळी मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष राजीव जलोटा, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. पी के उपाध्याय, सिप्झचे विभागीय आयुक्त श्याम जगन्नाथन, वस्त्रोद्योग आयुक्त रूपराशी, इसिजीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष सेन्थिलनाथन, केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाचे कमांडेंट वीरेंद्र प्रताप सिंग, टाटा रुग्णालयाचे डॉ अमित गुप्ता, पतंजली योग संस्थानचे पदाधिकारी यांच्यासह प्रशासानातले वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध विभागाचे कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | NM/ SSP/ST/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934104)
Visitor Counter : 120