विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविन या संपूर्णपणे डिजिटल मंचाच्या माध्यमातून लसींच्या 220 कोटी मात्रा देऊन भारताने संपूर्ण जगाला चकित केले, पाश्चिमात्य देशांनी देखील याची कधी कल्पना केली नव्हती- डॉ. जितेंद्र सिंह


डॉ. जितेंद्र सिंह यांनी “ डॉक्टर ऑन व्हील्स” या जम्मू काश्मीरमधील पहिल्या टेलिमेडिसिन स्टार्ट अप मोबाईल कॅम्पचे बिलावर येथे केले उद्घाटन

टेलिमेडिसिन मोबाईल सेवेत संपूर्ण शरीराच्या तपासणीची सोय उपलब्ध, त्यानंतर सुपर स्पेशालिटी डॉक्टरकडून तपासणी आणि नामवंत डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन देखील मिळणार- डॉ. जितेंद्र सिंह

बिलावर येथील मोफत टेलिमेडिसिन सुविधेमुळे उपचारसुविधांपर्यंत पोहोच, उपलब्धता आणि परवडण्याची क्षमता या समस्यांचे निराकरण होईल- डॉ. जितेंद्र सिंह

आजच्या काळात पुरवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधा जगातील कोणत्याही भागाइतक्या दर्जेदार आहेत, भविष्यात टेलिमेडिसिन सेवांचा वापर करून यंत्रमानवाद्वारे शस्त्रक्रिया देखील केल्या जाऊ शकतील- डॉ. जितेंद्र सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, समर्पण आणि स्टार्ट अप या मंत्राचे या टेलिमेडिसिन मोबाईल सेवांकडून असाधारण वैद्यकीय सुविधांसह पालन केले जात आहे

Posted On: 17 JUN 2023 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान , पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविन या संपूर्णपणे डिजिटल मंचाच्या माध्यमातून लसींच्या 220 कोटी मात्रा देऊन भारताने संपूर्ण जगाला चकित केले, ज्याची विकसित पाश्चिमात्य देशांनी देखील कधी कल्पना केली नव्हती. “डॉक्टर ऑन व्हील्स” या जम्मू काश्मीरमधील पहिल्या टेलिमेडिसिन स्टार्ट अप मोबाईल कॅम्पचे बिलावरमधील मांडली तालुक्यात उद्घाटन केल्यावर ते आज बोलत होते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्णपणे बिगर सरकारी स्रोतांकडून पुरवल्या जात असलेल्या पहिल्या वहिल्या मोबाईल टेलिमेडिसिन सेवेचा हा तिसऱा टप्पा आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. पहिल्या टप्प्यात दोडा जिल्ह्यातील दुर्गम गंदोहमधील 60 पेक्षा जास्त गावांचा समावेश करण्यात आला आणि दुसऱ्या टप्प्यात कथुआ या आतापर्यंत वैद्यकीय सेवांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या अतिदुर्गम गावांना समाविष्ट करण्यात आले.

बिलावरमधील मांडली येथी मोफत टेलिमेडिसिन कॅम्प उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील दोन स्टार्टअपकडून चालवण्यात येत आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

   

बिलावर येथे आजपासून सुरू झालेल्या मोफत टेलिमेडिसिन सुविधेमुळे उपचार सुविधांपर्यंत पोहोच, उपलब्धता आणि परवडण्याची क्षमता या समस्यांचे निराकरण होईल, असे डॉ. जितेंद्र सिंह  यांनी सांगितले. दर्जेदार सेवा, डॉक्टर्स आणि सहाय्य, प्रवासाचे अंतर आणि वैद्यकीय सल्ला/ उपचार यांचा खर्च यांसारख्या तिन्ही अडथळ्यांना या सुविधेच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे आणि त्यांचे प्रभावी पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. साधारणपणे महानगरांमध्ये एका रुग्णाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो आणि त्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. मात्र, अशा प्रकारच्या टेलिमेडिसिन कॅम्पमुळे या समस्येचे निराकरण होईल. विशेषत दुर्बल सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्यांच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज भारत विकसित देशांच्या तोडीस तोड असल्यावर भर देत जितेंद्र सिंह यांनी सांगितले की आजच्या काळात पुरवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधा जगातील कोणत्याही भागाइतक्या दर्जेदार आहेत आणि भविष्यात टेलिमेडिसिन सेवांचा वापर करून यंत्रमानवाद्वारे अत्याधुनिक शस्त्रक्रिया देखील केल्या जाऊ शकतील. हे सरकार गरिबांसाठी समर्पित असल्याने कमकुवत सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जनतेसाठी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, समर्पण आणि स्टार्ट अप या मंत्राचे या टेलिमेडिसिन मोबाईल सेवांकडून असाधारण वैद्यकीय सुविधांसह पालन केले जात आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933160) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu